नवी दिल्ली : शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट शेती करावी. छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांनी आपली जमीन एकत्र करून अधिक किंमत असलेली पिके घेण्यावर भर द्यावा. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होईल आणि उत्पन्न वाढेल, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
भारतीय कृषी संशोधन संस्थेत आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी कृषी क्षेत्रासाठी ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन योजना सुरू केल्या. यात पीएम धनधान्य कृषी योजनेसाठी २४,००० कोटी, मिशन फॉर आत्मनिर्भरता इन पल्सेस या योजनेसाठी ११,४४० कोटींची तरतूद केली आहे.
सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेती एकदम पूर्णपणे सुरू करू नका. आधी थोड्या जमिनीवर प्रयोग करा, बाकी पारंपरिक शेती सुरू ठेवा. अशाने अनुभव व आत्मविश्वास वाढतील, असा सल्ला मोदी यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.
भारतातील शेतीमध्ये नव्या कल्पना, तंत्रज्ञान आणि सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. समूह शेती आणि उच्च मूल्य पिके यामुळे ग्रामीण भारत समृद्ध होईल.
नरेंद्र मोदी, पंतप्रधान
हा खरा चमत्कार आहे...
एका महिला शेतकऱ्याने सांगितले की, 'पीएम किसान' मुळे तिला मूग पिक घेता आले. 'सखी' संस्थेच्या प्रतिनिधीने सांगितले की, २० महिलांपासून सुरू झालेला उपक्रम २०,००० महिलांपर्यंत पोहोचला. १४,००० महिला 'लखपती दीदी' बनल्या आहेत. यावेळी मोदी म्हणाले की, 'हा खरा चमत्कार आहे.'
आधी हॉटेलमध्ये काम, आता २५० गीर गायी
एका शेतकऱ्याने सांगितले की, तो आधी हॉटेलमध्ये काम करायचा, पण आता त्याच्याकडे २५० गीर गायींची गोशाळा आहे. पशुसंवर्धन मंत्रालयाने त्याला ५० टक्के अनुदान दिले. त्याचा मोठा फायदा झाला आहे.
दुसऱ्या शेतकऱ्याने मत्स्यपालन क्षेत्रात केलेल्या प्रगतीबद्दल सांगितले. सरकारच्या मदतीने त्याने ३०० एकरवर शेती आणि मत्स्यपालन सुरू करून २०० लोकांना रोजगार दिला आहे. त्याळे सर्वजण आनंदी आहे.
श्री अन्न (बाजरी, ज्वारी) चा प्रचार :
पाणीटंचाई असलेल्या भागांमध्ये बाजरी आणि ज्वारी हीच खरी जीवनरेखा आहे. जगभर श्री अन्नाची मागणी वाढत आहे. त्यामुळे या पिकांना प्रोत्साहन द्या, असे मोदींनी सांगितले.
तरुण शेतकऱ्यांच्या भन्नाट प्रयोगांचे केले कौतुक
या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी अनुभव सांगितले. यात जबलपूर (मध्य प्रदेश) येथील एका तरुणाने मातीशिवाय 'एरोपोनिक' पद्धतीने बटाट्याची शेती दाखवली. मोदींनी हसत त्याला 'जैन पोटॅटो' असे म्हटले.
हरयाणातील हिसार येथील
शेतकऱ्याने 'काबुली चणा' घेत असल्याचे सांगितले. त्याला प्रती एकर १० क्विंटल उत्पादन मिळते. मोदींनी विचारले की, चण्याबरोबर इतर पिके घेतात का? त्यावर शेतकऱ्याने सांगितले की, तूर, मूग यासारखी कडधान्ये घेतल्याने माती सुपीक राहते.
एका शेतकऱ्याने सांगितले की, ३ १,२०० एकरवर रेझिड्यू-फ्री काबुली चणा' शेती होते. एकत्र शेती केल्याने चांगला बाजारभाव आणि जास्त नफा मिळतो. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेती केली तर उत्पादन वाढते, खर्च कमी होतो, असे मोदींनी यावेळी सांगितले.