Meta Layoffs : जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी आणि फेसबुकची मूळ कंपनी असलेल्या 'मेटा'कडून पुन्हा एकदा मोठ्या कर्मचारी कपातीचे संकेत मिळाले आहेत. मागील वर्षी मायक्रोसॉफ्ट आणि टीसीएस सारख्या कंपन्यांनी केलेल्या कपातीनंतर, आता २०२६ मध्येही हे सत्र सुरूच राहणार असल्याचे दिसत आहे. मेटा आपल्या 'रिअॅलिटी लॅब्स' विभागातील सुमारे १,५०० हून अधिक कर्मचाऱ्यांना नारळ देण्याच्या तयारीत आहे.
'रिअॅलिटी लॅब्स'ला मोठा फटका
'न्यूयॉर्क टाइम्स'च्या वृत्तानुसार, मेटाच्या या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम ऑगमेंटेड रिअॅलिटी आणि व्हर्च्युअल रिअॅलिटी वर काम करणाऱ्या 'रिअॅलिटी लॅब्स' युनिटवर होणार आहे. या विभागातील एकूण १५,००० कर्मचाऱ्यांपैकी सुमारे १० टक्के कर्मचाऱ्यांची कपात केली जाणार आहे. मेटा आता मेटाव्हर्सपेक्षा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सेंटर्समध्ये मोठी गुंतवणूक करण्यावर भर देत आहे. या नवीन गुंतवणुकीसाठी इतर विभागांतील खर्च कमी करण्यासाठी ही कपात केली जात असल्याचे बोलले जात आहे.
महत्त्वाची बैठक आणि कर्मचाऱ्यांमध्ये धाकधूक
कंपनीचे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर अँड्र्यू बॉसवर्थ यांनी बुधवारी रिअॅलिटी लॅब्सच्या सर्व कर्मचाऱ्यांची एक तातडीची बैठक बोलावली आहे. सर्व कर्मचाऱ्यांना या बैठकीला वैयक्तिकरित्या उपस्थित राहण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत. ही बैठक कपातीच्या घोषणेच्या एक दिवस आधी होत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे आणि अनिश्चिततेचे वातावरण आहे.
ओकुलस ते रिअॅलिटी लॅब्स
रिअॅलिटी लॅब्स हा मेटाचा तो महत्त्वाचा विभाग आहे जो पूर्वी 'ओकुलस' म्हणून ओळखला जात असे. २०१४ मध्ये फेसबुकने (आताचे मेटा) ओकुलसचे अधिग्रहण केले होते. मार्क झुकरबर्ग यांनी 'मेटाव्हर्स'च्या स्वप्नासाठी या विभागात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली होती. मात्र, आता वाढत्या स्पर्धेत 'एआय'ला प्राधान्य देण्यासाठी या विभागात कर्मचारी कपात केली जात आहे.
वाचा - ३२ वर्षीय तरुण बनणार टाटा ग्रुपचे पॉवर सेंटर? विश्वस्तांच्या वादात नोएल टाटांची पकड मजबूत
भारतातील आयटी प्रोफेशनल्सवर परिणाम?
मेटाच्या या जागतिक कपातीचा परिणाम जगभरातील कर्मचाऱ्यांवर होणार आहे. यात भारतीय अभियंते आणि तंत्रज्ञांचाही समावेश असण्याची शक्यता आहे. २०२६ च्या सुरुवातीलाच आलेल्या या बातमीमुळे आयटी क्षेत्रात पुन्हा एकदा नोकरीच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
