Underwear Economy Index : अंडरवेअर, लॉन्जरी किंवा अंतर्वस्त्रांसारख्या वस्तूंवर सार्वजनिकपणे बोलणे लोक सहसा टाळतात. अनेकदा खरेदी करतानाही अनेक ग्राहकांना संकोच वाटतो. कारण ही गोष्ट पूर्णपणे आपल्या खाजगी आयुष्याशी निगडीत असते. पण तुम्हाला हे माहीत आहे का, की हे अंतर्वस्त्र फक्त तुमच्या स्वच्छतेचीच नाही, तर देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती उघड करतात? अर्थशास्त्रात एक अनौपचारिक थिअरी आहे, जी याच अंतर्वस्त्रांच्या विक्रीवर आधारित आहे. ती म्हणजे 'मेन्स अंडरवेअर इंडेक्स'.
अंडरवेअर इंडेक्स काय आहे?
अमेरिकेचे दिग्गज अर्थशास्त्रज्ञ आणि अमेरिकेच्या सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हचे माजी अध्यक्ष ॲलन ग्रीनस्पॅन यांनी या थिअरीबद्दल सर्वात आधी सांगितले. त्यांच्या सिद्धांतानुसार, पुरुषांच्या अंडरवेअरची विक्री आणि किंमत यावरून देशात मंदी आहे की नाही, याचा अंदाज लावला जातो.
अंडरवेअरचे अर्थशास्त्र
ॲलन ग्रीनस्पॅन यांच्या मते अंडरवेअर ही वैयक्तिक स्वच्छतेसाठी आवश्यक वस्तू आहे. याची मागणी सहसा स्थिर असते, कारण इतर कपड्यांप्रमाणे ती वारंवार खरेदी केली जात नाही. लोक जुने अंडरवेअर फाटेपर्यंत वापरतात, पण गरज म्हणून ते खरेदी करावेच लागते. जेव्हा देशात अंडरवेअरसारख्या आवश्यक वस्तूंची मागणी अचानक कमी होऊ लागते, तेव्हा हे दर्शवते की लोकांची कमाई घटली आहे. लोक अनावश्यक खर्चांपासून वाचत आहेत आणि पैशाची बचत भविष्यासाठी करत आहेत. अंडरवेअरची विक्री घटण्याचा अर्थ असा आहे की, लोक जुन्या आणि फाटलेल्या अंडरवेअरवर काम चालवत आहेत.
जर अंडरवेअरच्या किमतीत घट झाली किंवा विक्री कमी झाली, तर लोकांनी आनंद मानण्याऐवजी चिंता करायला हवी, कारण हे अर्थव्यवस्थेत मंदीचे संकेत असू शकतात.
अमेरिकेत मंदीचे संकेत
फेब्रुवारी २०२३ मध्ये फॉर्च्युनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, २०२२ मध्ये अमेरिकेत अचानक अंडरवेअरची विक्री (आणि किंमत) कमी झाली होती. हा काळ कोविड महामारीनंतरचा होता, जिथे बेरोजगारी वाढत होती आणि अर्थव्यवस्था मंदीच्या उंबरठ्यावर होती.
'मेन्स अंडरवेअर इंडेक्स' हा अर्थव्यवस्थेचे मूल्यांकन करण्याचा कोणताही अधिकृत मापदंड नाही. पण हा एक अनौपचारिक निर्देशांक आहे. जेव्हा अर्थव्यवस्थेची स्थिती चांगली असते, तेव्हा लोक अशा वस्तूंवरही खर्च करतात ज्या बाहेरून दिसत नाहीत. याउलट, आर्थिक स्थिती बिघडल्यास, लोक सर्वात आधी याच वस्तूंची खरेदी थांबवून पैसे वाचवतात. म्हणजेच, तुमच्या अंडरवेअरची स्थिती देशाच्या आर्थिक आरोग्याची कहाणी सांगते!
