Property Fraud : तुम्ही मालमत्ता खरेदी किंवा विक्री करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमचे डोळे उघडू शकते. रिअल इस्टेट क्षेत्रातील एक मोठी आणि खळबळजनक फसवणूक समोर आली आहे. या प्रकरणात गुरुग्राममधील प्रतिष्ठित '३२nd माइलस्टोन' प्रकल्पाचा संचालक ध्रुव शर्मा याला पोलिसांनी अटक केली आहे. एकाच व्यावसायिक युनिटचे तब्बल २५ वेळा 'सेल एग्रीमेंट' करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
नेमके प्रकरण काय?
मॅसेर्ज ट्रॉम व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने दिलेल्या तक्रारीनुसार हे प्रकरण उघडकीस आले. २०२१ मध्ये ध्रुव शर्माच्या '३२nd विस्टा प्रायव्हेट लिमिटेड'ने सेक्टर-१५ मधील ३२nd माइलस्टोन इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील ३००० स्क्वेअर फूटची जागा विकण्याचा प्रस्ताव दिला. २ कोटी ५० लाख रुपयांमध्ये हा व्यवहार निश्चित झाला आणि खरेदीदार कंपनीने संपूर्ण रक्कम देऊन 'एग्रीमेंट टू सेल' करून घेतले. पैसे देऊनही ध्रुव शर्माने मालमत्तेची 'कन्व्हेयन्स डीड' (नोंदणी) करण्यास टाळाटाळ केली. वारंवार पाठपुरावा करून आणि ऑक्टोबर २०२३ मध्ये कायदेशीर नोटीस बजावूनही कंपनीला दाद मिळाली नाही.
तपासातील धक्कादायक वास्तव
जेव्हा पीडित कंपनीने स्वतः या मालमत्तेची चौकशी केली, तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. ज्या जागेसाठी त्यांनी अडीच कोटी रुपये दिले होते, ती जागा ध्रुव शर्माने २०२२ ते २०२३ या काळात इतर २५ वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावावर आधीच नोंदवून दिली होती. "एकाच युनिटचा वापर करून अनेकांकडून पैसे उकळण्याचा आणि फसवणुकीचा हा सुनियोजित कट होता," असे तपासात निष्पन्न झाले आहे.
गुन्हा दाखल करुन अटक
या गंभीर फसवणुकीप्रकरणी २ जानेवारी २०२६ रोजी गुरुग्राममधील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सखोल तपासानंतर पोलिसांनी ध्रुव शर्माला अटक केली आहे. एनसीआर मधील एका बड्या बिल्डरला अशा प्रकारे अटक झाल्याने रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
वाचा - सोन्याचा भाव दीड लाखांच्या पार! चांदी २.८५ लाखांवर; गुंतवणूकदारांनी अजून वाट पाहावी का?
घर किंवा मालमत्ता खरेदी करताना 'या' गोष्टी तपासा
- रेरा नोंदणी : प्रकल्प रेरा अंतर्गत नोंदणीकृत आहे का? त्यावरील तक्रारींची स्थिती तपासा.
- टायटल सर्च रिपोर्ट : मालमत्तेचा गेल्या ३० वर्षांचा टायटल सर्च रिपोर्ट वकिलाकडून तपासून घ्या.
- बोजा : मालमत्तेवर आधीच कोणाचे कर्ज किंवा कायदेशीर बोजा नाही ना, याची खात्री करा.
- पजेशन आणि डीड : केवळ 'एग्रीमेंट टू सेल'वर विसंबून न राहता, तातडीने नोंदणीकृत विक्री खत करून घेण्याचा आग्रह धरा.
