LPG Cylinder Price : पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे विस्कळीत झालेल्या एलपीजी पुरवठ्याबाबत भारतासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. इराण आणि इस्रायलमधील संघर्षाच्या केंद्रस्थानी असलेल्या 'स्ट्रेट ऑफ होर्मुज'मधून भारतीय एलपीजी टँकर 'ग्रीन सांवरी' यशस्वीरीत्या बाहेर पडला आहे. सुमारे ४६,६५० टन एलपीजी साठा असलेला हा टँकर आता भारताच्या दिशेने मार्गस्थ झाला असून, यामुळे देशातील गॅस टंचाईचे सावट काही अंशी कमी होण्याची चिन्हे आहेत.
युद्धभूमीतून यशस्वी प्रवास
२८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' हा जलमार्ग अत्यंत धोकादायक बनला होता. 'ग्रीन सांवरी' हा होर्मुजची सामुद्रधुनी ओलांडणारा सातवा भारतीय एलपीजी टँकर ठरला आहे. या टँकरमधील ४६,६५० टन एलपीजी भारताच्या निम्म्या दिवसाची गरज पूर्ण करण्यास सक्षम आहे. दरम्यान, इराणहून आलेले आणखी एक मालवाहू जहाज मंगळूर बंदरात दाखल झाले असून, लाल समुद्रातील तणावानंतरही इंधनाचा पुरवठा सुरू असल्याचे हे संकेत आहेत.
गॅस सिलिंडरचे 'भडकलेले' दर
पुरवठा सुरू असला तरी जागतिक बाजारपेठेतील दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे. १ एप्रिल रोजी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात १९५.५० रुपयांची मोठी वाढ करण्यात आली आहे.
प्रमुख शहरांतील घरगुती (१४.२ किलो) आणि व्यावसायिक (१९ किलो) सिलिंडरचे दर
| शहर | घरगुती सिलिंडर (रुपये) | व्यावसायिक सिलिंडर (रुपये) |
| मुंबई | ९१२.५० | २,०३०.५० |
| पुणे | ९६० | २,०४५.०० |
| दिल्ली | ९१३.०० | २,०७८.५० |
| कोलकाता | ९३९.०० | २,१९२.५० |
| चेन्नई | ९२९.०० | २,२४३.५० |
वाचा - पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
पुरवठ्यातील अनिश्चितता आणि चिंता
सरकारने पुरवठा सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न सुरू ठेवले असले तरी, अनेक भागांत अनियमित पुरवठ्यामुळे ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. व्यावसायिक सिलिंडर दोन हजार रुपयांच्या पार गेल्याने हॉटेल व्यावसायिक आणि छोट्या दुकानदारांचे बजेट कोलमडले आहे. घरगुती गॅसच्या किमतीतही ७ मार्च रोजी ६० रुपयांची वाढ झाल्याने गृहिणींचे गणित बिघडले आहे.
