lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > प्रेम हे ‘कर’मुक्त?

प्रेम हे ‘कर’मुक्त?

कृष्णा, ‘व्हॅलेंंटाइन डे’ला प्रेमाचा उत्सव असतो. प्रेमापायी आर्थिक व्यवहार वा पैशाची देवाण-घेवाण होत असते. त्यासंबंधी आयकरात काय आहे? म्हणजे प्रेम ‘कर’मुक्त आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 12:10 AM2018-02-12T00:10:53+5:302018-02-12T00:11:07+5:30

कृष्णा, ‘व्हॅलेंंटाइन डे’ला प्रेमाचा उत्सव असतो. प्रेमापायी आर्थिक व्यवहार वा पैशाची देवाण-घेवाण होत असते. त्यासंबंधी आयकरात काय आहे? म्हणजे प्रेम ‘कर’मुक्त आहे?

Love is 'tax' free? | प्रेम हे ‘कर’मुक्त?

प्रेम हे ‘कर’मुक्त?

अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, ‘व्हॅलेंंटाइन डे’ला प्रेमाचा उत्सव असतो. प्रेमापायी आर्थिक व्यवहार वा पैशाची देवाण-घेवाण होत असते. त्यासंबंधी आयकरात काय आहे? म्हणजे प्रेम ‘कर’मुक्त आहे?
कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, प्रेम हे सर्व कर्मांचे मूळ आहे. जसे पती-पत्नी, आई-वडील व मुले, मित्रमंडळी, नवयुवक-युवती यांच्या संबंधांचा पाया प्रेमच आहे. निखळ प्रेम आजकाल क्वचितच पाहायला मिळते. व्यवहारात प्रेमापायी वा आपुलकीपायी काही पैशाची देवाण-घेवाण करताना आयकर लागू शकतो. म्हणून ते तपासून घ्यावे, तसेच काही ठरावीक व्यक्तींसोबतच केलेले प्रेमाचे व्यवहार ‘कर’मुक्त आहेत.
अर्जुन : कृष्णा, प्रेमाच्या घटनांसोबत आयकराची चर्चा करू या. लग्न करण्यापूर्वी प्रेमसंबंध जुळत असताना, एक-दुसºयास भेटवस्तू किंवा पैशाची देणगी दिल्यास यामध्ये करप्रणाली कशी असते. प्रेम हे ‘कर’मुक्त आहे का ?
कृष्ण : अर्जुना, लग्नाअगोदरचा काळ नवयुवक-युवतींसाठी सुवर्णकाळ असतो, परंतु आयकर आणि इतर कायद्यानुसार लग्न झाल्यानंतरच पती-पत्नीला मान्यता मिळते. म्हणूनच लग्नापूर्वी गिफ्ट दिल्यास व त्याचे मूल्य ५० हजारांपेक्षा जास्त असल्यास गिफ्ट घेणाºयास टॅक्स लागू शकतो.
अर्जुन : नवयुवक-युवतींच्या लग्नामध्ये पैसे वा गिफ्ट, घरसंसार खर्च इत्यादींच्या व्यवहाराचे काय?
कृष्ण : अर्जुना, नवयुवक-युवतींच्या आयुष्यातील आणि २ कुटुंबांच्या मनोमिलनाची वेळ लग्नाद्वारे येते. सर्वत्र आनंदीआनंद असतो. याद्वारे मनुष्याच्या जीवनात प्रेमाच्या पुढील सुखद प्रवासाची सुरुवात होते. लग्न समारंभात मिळालेले सर्व गिफ्ट्स व ते कुणाकडूनही मिळाल्यास, कितीही किमतीचे मिळाल्यास करमाफ आहे, परंतु ते कुणाकडून मिळाले, याची यादी ठेवावी, तसेच लग्नाचा खर्च, हनिमून टूर इत्यादींचा खर्च नीट हिशेब करून ठेवावा. पत्नीला मिळालेल्या दागिन्यांचा पती-पत्नीने नीट सांभाळ करावा. कारण लग्नामध्ये माहेरकडून मिळालेल्या वस्तूंवर ‘स्त्रीधन’ म्हणून पत्नीचे अधिक प्रेम असते. पती-पत्नीने आर्थिक नियोजन केल्यास, त्यांच्या प्रेमसंबंधांत आर्थिक अडचण येणार नाही. शक्यतो, गुंतवणूक जॉइंट नावावर करावी, तसेच पतीने पत्नीस गिफ्ट दिल्यास, त्या गिफ्टवरील उत्पन्न क्लबिंग तरतुदीद्वारे ते आयकरात पतीच्या उत्पन्नात गृहीत धरले जाते. पती-पत्नी स्वतंत्र नोकरी अथवा व्यवसाय करत असल्यास आयकराचे नियम वेगवेगळे लागू होतील. दोघांना स्वतंत्र आयकर रिटर्न भरावे लागेल.
अर्जुन : कृष्णा, मूलबाळ झाल्यानंतर पती-पत्नीने आर्थिक व्यवहार प्रेमळपणे कसे सांभाळावे?
कृष्ण : अर्जुना, पती-पत्नीने मुलांच्या शिक्षणाचा खर्च, गृहकर्ज, विमा पॉलिसी, आरोग्य विमा, तसेच आरोग्यावरील खर्च, भविष्यनिर्वाह निधी इत्यादी खर्च व सवलत आयकरानुसार घेऊन मुलांनाही त्याचा फायदा होईल, असे नियोजन करावे. आयकर कायद्यानुसार मुलांच्या ट्युशन फीची वजावट मिळते, तसेच शैक्षणिक कर्जाचीही वजावट मिळते. पती-पत्नी आपल्या उत्पन्नातून खर्च झाल्यास ती वजावट घेऊ शकतात, तसेच आईवडिलांनी मुलांना गिफ्ट दिल्यास मुलांना ते करमाफ होईल.
अर्जुन : आपत्ये मोठी झाल्यानंतर म्हातारपणाची सोय कशी करावी?
कृष्ण : अर्जुना, पती-पत्नीने स्वत:च्या म्हातारपणाचे नियोजन, स्वास्थ्य उत्तम ठेवण्याकडे आणि आर्थिक सुलभतेकडे लक्ष द्यावे. कारण म्हातारपणात कुणाला पैसे मागणे चांगले वाटत नाही. म्हणून बचत करून बँकेत डिपॉझिट, जमीन, घर इत्यादी पती-पत्नीने जॉइंट नावाने करून आनंदाने राहावे. सीनियर सिटिझन्सचा लाभ आयकरात ६० वर्षांच्या वर असल्यास मिळतो. २०१८च्या अर्थसंकल्पात वरिष्ठ नागरिकांना अनेक फायदे मिळाले. बचतीवरील व्याजाच्या वजावटीची मर्यादा १५ हजारांवरून ५० हजार करण्यात आली, तसेच निर्दिष्टित आजारावरील वैद्यकीय खर्चाची वजावटीची मर्यादाही १ लाखांपर्यंत वाढविली.
अर्जुन : पती-पत्नी, मित्रमंडळी व नातेवाइकांसोबतच्या व्यवहाराचे काय?
कृष्ण : अर्जुना, आयकरात नातेवाइकांची व्याख्या दिलेली आहे, परंतु मित्राची व्याख्या कोणत्याही कायद्यात नाही, तसेच वडिलोपार्जित संपत्तीचे व्यवहार कायद्यानुसारच करावेत. मित्रमंडळींच्या संबंधात पैसा आणू नये. पैशाचा व्यवहार मित्रासोबत झाल्यास आयकरानुसार तो करपात्र होईल. म्हणजेच हँड लोन, अडव्हान्स म्हणून मदत प्रेमापायी मित्रांना केल्यास, व्यावहारिक दृष्टीकोनातून व्याजाचे उत्पन्न इत्यादी दाखवावे. अन्यथा आयकर कायद्यानुसार अडचण निर्माण होऊ शकते. मित्राकडून गिफ्ट ५० हजारांवर मिळाल्यास करपात्र होईल.
अर्जुन : प्रेमासोबत पैशाचा संबंध कसा सांभाळावा ?
कृष्ण : अर्जुना, व्हॅलेंटाइन डे निमित्त प्रेमाचे प्रतीक म्हणून गिफ्ट इत्यादी आपल्या व्यक्तींना जरूर द्यावे. प्रेम हे करमुक्त आहे, परंतु पैशासाठी प्रेम केल्यास तसे होत नाही.

Web Title: Love is 'tax' free?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Taxकर