LIC Investment List : अदानी समूहातील भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या गुंतवणुकीवरून अमेरिकेतील 'वॉशिंग्टन पोस्ट' वृत्तपत्राने दिलेल्या एका अहवालामुळे देशाच्या राजकारणात आणि वित्तीय क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे. विरोधकांनी सरकारला यावर प्रश्न विचारले असताना, एलआयसीने मात्र हा अहवाल पूर्णपणे 'भ्रामक' असल्याचे सांगून तो फेटाळून लावला आहे.
वॉशिंग्टन पोस्टच्या अहवालात एलआयसीवरअदानी समूहाला फायदा पोहोचवण्यासाठी मे २०२५ मध्ये ३.९ अब्ज डॉलर (सुमारे ३३,००० कोटी) ची मोठी गुंतवणूक केल्याचा आरोप आहे. एलआयसीने हा अहवाल कंपनीची स्वच्छ प्रतिमा आणि भारताच्या मजबूत वित्तीय क्षेत्राचे नुकसान करण्यासाठी जारी केल्याचा आरोप केला आहे.
या पार्श्वभूमीवर, एलआयसीची अदानी समूहातील नेमकी गुंतवणूक किती आहे? देशातील इतर कोणत्या दिग्गज कंपन्यांमध्ये तिचा सर्वाधिक पैसा गुंतलेला आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
एलआयसीची अदानी समूहातील हिस्सेदारी
सप्टेंबर २०२५ च्या आकडेवारीनुसार, एलआयसीची अदानी समूहाच्या प्रमुख कंपन्यांमध्ये असलेली हिस्सेदारी खालीलप्रमाणे आहे:
| कंपनीचे नाव | एलआयसीची हिस्सेदारी |
| अदानी पोर्ट्स | ७.७३% |
| अदानी एंटरप्रायझेस | ४.१६% |
| अदानी ग्रीन एनर्जी | १.३% |
| अदानी एनर्जी सोल्युशन | ३.४२% |
| अदानी टोटल गॅस | ६% |
| अंबुजा सिमेंट | ७.३१% |
| एसीसी लिमिटेड | ९.९५% |
एलआयसीच्या इक्विटीमधील एकूण गुंतवणूक सुमारे १६ लाख कोटी रुपये आहे, तर अदानी समूहातील एकूण गुंतवणूक सुमारे ६०,००० कोटी रुपये आहे. याचा अर्थ, एलआयसीच्या एकूण गुंतवणुकीपैकी केवळ ४% हिस्सा अदानी समूहात आहे.
एलआयसीचे सर्वात मोठे 'टॉप ५' गुंतवणूक पोर्टफोलिओ
- एलआयसीने अदानी समूहापेक्षा देशातील इतर अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. एलआयसीचे सर्वात मोठे ५ गुंतवणूक पोर्टफोलिओ खालीलप्रमाणे आहेत.
- रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड : एलआयसीची RIL मध्ये सुमारे १.३८ लाख कोटींची गुंतवणूक आहे, जी कंपनीतील सुमारे ६.९४% भागीदारी दर्शवते.
- आयटीसी लिमिटेड : या कंपनीत एलआयसीची गुंतवणूक ८२,३४२ कोटी आहे, जी १५.८६% हिस्सा आहे.
- एचडीएफसी बँक लिमिटेड : एलआयसीने या बँकेत सुमारे ७२,५०० कोटी रुपये गुंतवले आहेत, ज्यामुळे एलआयसीचा ५.४५% हिस्सा बनतो.
- स्टेट बँक ऑफ इंडिया : SBI मध्ये एलआयसीची सुमारे ९.५९% हिस्सेदारी आहे, ज्याची किंमत सुमारे ६८,००० कोटी रुपये आहे.
- लार्सन अँड टुब्रो लिमिटेड : एलआयसीची L&T मध्ये ६६,०५३ कोटींची गुंतवणूक आहे, जी १३% पेक्षा जास्त भागीदारी दर्शवते.
या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की, एलआयसीच्या टॉप-५ गुंतवणुकीच्या यादीत अदानी समूहाचा समावेश नाही. एलआयसीच्या एकूण इक्विटी पोर्टफोलिओमध्ये बँकिंग, आयटी आणि कंझ्युमर सेक्टरच्या कंपन्यांचे वर्चस्व आहे. एलआयसीसाठी अदानी समूह महत्त्वपूर्ण असला तरी, त्याचा हिस्सा एकूण गुंतवणुकीच्या तुलनेत खूपच मर्यादित आहे.
अदानी समूहाचे स्पष्टीकरण
अदानी समूहाने म्हटले आहे की, एलआयसीची त्यांच्या समूहातील गुंतवणूक इतर मोठ्या समूहांपेक्षा कमी आहे आणि ही पोर्टफोलिओ विविधीकरण धोरणाचा एक भाग आहे. एलआयसीचे गुंतवणुकीचे निर्णय हे बोर्ड स्तरावर घेतले जातात आणि नियामक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जाते, यात सरकारची कोणतीही भूमिका नसते, असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
