Lenskart IPO: कधीकधी एका लहान कल्पनेतून सुरू झालेली कंपनी इतकी मोठी होते की ती आपल्या संस्थापकांना मालामाल करते. चष्मा विकणारी ऑनलाइन कंपनी लेन्सकार्ट (Lenskart) असंच काहीसं करणार आहे. ही कंपनी आता सुमारे ७०,००० कोटी रुपये मूल्यांकनावर आपला IPO बाजारात आणणार आहे. या माध्यमातून कंपनीचे चारही सह-संस्थापक मिळून जवळपास १,२०० कोटी रुपये कमावणार आहेत.
संस्थापकांचा मोठा वाटा
कंपनीच्या माहितीनुसार, या इश्यूमधून CEO पीयूष बंसल यांना सर्वाधिक, सुमारे ८२४ कोटी रुपये मिळतील. त्यांची बहीण आणि सह-संस्थापक नेहा बंसल यांना सुमारे ४१ कोटी रुपयांची रक्कम प्राप्त होईल. विशेष म्हणजे, नेहा यांनी यापूर्वीच डीमार्टचे संस्थापक राधाकिशन दमानी यांच्या पत्नी श्रीकांता आर दमानी यांना शेअर्स विकून ९० कोटी रुपये कमावले आहेत. उर्वरित दोन संस्थापक अमित चौधरी आणि सुमित कपाही यांना देखील प्रत्येकी सुमारे ११५-११५ कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे.
१८% हिस्सा कायम
कमाईनंतरही हे चारही संस्थापक कंपनीचे प्रवर्तक म्हणून कायम राहतील आणि त्यांच्याकडे मिळून सुमारे १८ टक्के हिस्सा शिल्लक राहील. या हिस्स्याचं सध्याचं बाजारमूल्य १२,००० ते १३,००० कोटी रुपये इतके आहे. Lenskart चं मूल्यांकन २०२१ मध्ये २.४ अब्ज डॉलरवरून वाढून २०२५ मध्ये ६.१ अब्ज डॉलर झालं आहे. ही वाढ भारतातील ऑर्गनाइझ्ड आयवियर बाजाराची क्षमता दर्शवते. तसंच, जुलै २०२५ मध्ये पीयूष बंसल यांनी २२२ कोटी रुपये खर्च करून कंपनीतील आपला हिस्सा २.५ टक्क्यांनी वाढवला होता.
IPO ची तारीख
लेन्सकार्टचा ७,३०० कोटी रुपयांचा IPO हा ३१ ऑक्टोबरला उघडणार आहे. यानतंर कंपनीचे शेअर्स १० नोव्हेंबरला लिस्ट होण्याची अपेक्षा आहे.
गुंतवणूकदारांना बंपर परतावा
मोठ्या गुंतवणूकदार कंपन्यांसाठी हा IPO फायद्याचा ठरत आहे. सॉफ्टबँक आणि केदार कॅपिटल यांना या IPO मधून ५ ते ६ पट परतावा मिळण्याची अपेक्षा आहे. सॉफ्टबँकनं २०१९ मध्ये सुमारे २,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. ते आता १,०२५ कोटी रुपयांचे शेअर्स विकूनही जवळपास ९,००० कोटी रुपयांचा हिस्सा कायम ठेवणार आहेत. प्रेमजी इन्व्हेस्टसाठी हा करार सर्वात शानदार ठरला असून त्यांना सुमारे १७ पट फायदा झाला आहे. त्याचबरोबर, टेमसेक (Temasek) ला देखील गेल्या वर्षीच्या गुंतवणुकीवर ४ पट नफा मिळाला आहे.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
