CJI Surya Kant Facilities: देशाला आज ५३ वे नवे सरन्यायाधीश लाभले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांना भारताचे सरन्यायाधीश म्हणून पदाची शपथ दिली. न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी देशातील अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या निर्णयांमध्ये सहभाग घेतला आहे. आता ते पुढील सुमारे १५ महिने देशाचे मुख्य न्यायाधीश म्हणून पदभार सांभाळतील. न्यायमूर्ती सूर्यकांत यांची CJI पदी नियुक्ती झाल्यानंतर, त्यांना मिळणारा पगार आणि सुविधा माहिती आहे का?
सरन्यायाधीशांचा मासिक पगार आणि भत्ते
भारताच्या सरन्यायाधीशांना दरमहा२,८०,००० रुपये इतका मासिक पगार मिळतो. या व्यतिरिक्त, त्यांना दरमहा ४५,००० रुपयांचा आतिथ्य भत्ता दिला जातो. आर्थिक लाभांमध्ये, त्यांना एकदाच १० लाख रुपयांचा फर्निशिंग भत्ता देखील मिळतो. निवृत्त झाल्यानंतर, सरन्यायाधीशांना १६ लाख ८० हजार रुपये अधिक महागाई भत्ता असे वार्षिक निवृत्तीवेतन मिळते. तसेच, त्यांना २० लाख रुपयांची ग्रॅच्युइटी देखील दिली जाते.
वेतन व भत्त्यांव्यतिरिक्त मिळणाऱ्या प्रमुख सुविधा
- निवासस्थान : त्यांना दिल्लीमध्ये सर्वात उच्च श्रेणीतील बंगला मिळतो.
- कर्मचारी आणि सुरक्षा : निवासस्थानावर २४ तास सुरक्षा, तसेच नोकर-चाकर आणि लिपिक इत्यादींची सुविधा उपलब्ध असते.
- वाहन सुविधा : फिरण्यासाठी सरकारी गाडी आणि चालकाची सुविधा मिळते, तसेच गाडीसाठी दरमहा २०० लीटरपर्यंत पेट्रोल/डिझेल दिले जाते.
- इतर लाभ : या व्यतिरिक्त, त्यांना प्रवास भत्ता आणि पीसीओ सुविधा देखील मिळते.
न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा कार्यकाळ
न्यायमूर्ती सूर्यकांत यांना ३० ऑक्टोबर रोजी पुढील सरन्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले होते. ते सुमारे १५ महिने या पदावर राहतील आणि ९ फेब्रुवारी २०२७ रोजी ते वयाच्या ६५ व्या वर्षी निवृत्त होतील.
वाचा - लंडनमध्ये राहणाऱ्या अब्जाधीशांना झटका! अतिरिक्त टॅक्स भरावा लागणार; भारतात काय निमय?
हरियाणातील हिसार येथे मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी कुरुक्षेत्र विद्यापीठातून कायद्याचे पदव्युत्तर शिक्षण 'प्रथम श्रेणीत प्रथम' येऊन पूर्ण केले आहे. एका छोट्या शहरातील वकिलीपासून देशातील सर्वोच्च न्यायिक पदापर्यंतचा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे.
