ICC T20 World Cup 2026 : भारतातील कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी बातमी येत आहे. पुढील वर्षी होणाऱ्या आयसीसी टी२० वर्ल्ड कपचे थेट प्रक्षेपण तुम्ही मोबाईलवर पाहू शकणार नाही. कारण, देशातील प्रमुख डिजिटल ब्रॉडकास्टर असलेल्या 'जिओस्टार'ने आयसीसी टी२० वर्ल्ड कपच्या थेट प्रक्षेपणातून माघार घेतली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज नियंत्रित जिओस्टारने आयसीसीला अधिकृतपणे कळवले आहे की, ते त्यांच्या चार वर्षांच्या इंडिया मीडिया-राईट्स डीलचा उर्वरित दोन वर्षांचा कालावधी पूर्ण करू शकणार नाहीत.
दुसऱ्या कंपनीलाही रस नाही
जिओस्टारने माघार घेतल्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांची चिंता वाढली आहे, तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची झोप उडाली आहे. जिओस्टार करारातून बाहेर पडणार असल्याचे संकेत मिळताच, आयसीसीने लगेचच सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया, नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ यांच्याशी भारतातील मीडिया राइट्ससाठी संपर्क साधला आहे. मात्र, आतापर्यंत कोणत्याही प्लॅटफॉर्मने किमती आणि नफ्याशी संबंधित चिंतेमुळे टी२० विश्वचषकाच्या थेट प्रक्षेपणात विशेष रस दाखवलेला नाही. यामुळे आयसीसीची डोकेदुखी आणखी वाढली आहे.
१२,५४८ कोटींचे मोठे नुकसान
जिओस्टारने माघार घेण्यामागे मोठा आर्थिक फटका हे मुख्य कारण आहे. एका नियामक फाइलिंगनुसार, स्टार इंडियाला ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात १२,५४८ कोटींचे मोठे नुकसान झाले होते. हे नुकसान प्रामुख्याने आयसीसी मीडिया-राइट्स डीलशी संबंधित एका कठीण करारासाठी केलेल्या १२,३१९ कोटींच्या तरतुदीमुळे झाले होते.
वाचा - सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारने लोकसभेत दिली 'डेटलाइन'
प्रसारणात अडथळा येण्याची शक्यता
आयसीसीच्या एकूण महसुलात भारताचा वाटा सुमारे ८०% आहे. या पार्श्वभूमीवर, जर आयसीसीला त्वरित नवीन ब्रॉडकास्टर मिळाला नाही, तर भारतात होणाऱ्या टी२० विश्वचषकाचे थेट प्रसारण अडकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास, भारतातील कोट्यवधी क्रिकेट चाहते आपल्या मोबाईल फोनवर विश्वचषकाचे सामने लाईव्ह पाहू शकणार नाहीत, ज्यामुळे क्रिकेटच्या सर्वात मोठ्या इव्हेंटवर मोठे संकट ओढवले आहे.
