Jaiprakash associates limited: जयप्रकाश असोसिएट्स लिमिटेडचे शेअर्स काही दिवसांपासून फोकसमध्ये आहेत. गेल्या अनेक सत्रांपासून शेअरला अपर सर्किट लागत आहे. बीएसईवर हा शेअर इंट्राडे उच्चांकी पातळी ४.१८ रुपयांवर पोहोचला. यामध्ये ५ टक्क्यांचं अप्पर सर्किटवर लागलं. १२ ऑगस्टपर्यंतची ही किंमत आहे. आज १३ ऑगस्ट रोजी कंपनीच्या शेअर्सचा व्यवहार होत नाही. गेल्या पाच दिवसांत कंपनीचे शेअर्स १६ टक्क्यांपर्यंत वाढलेत. कर्जबाजारी कंपनी दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात आहे. कंपनीच्या शेअर्समुळे दीर्घकालीन गुंतवणुकदारांचं मोठं नुकसान झालंय. ४ जानेवारी २००८ रोजी कंपनीचे शेअर्स ३२३ रुपयांवर पोहोचले होते.
१४ ऑगस्ट रोजी बैठक
गुरुवार, १४ ऑगस्ट हा दिवस जयप्रकाश असोसिएट्स लिमिटेडसाठी महत्त्वाचा दिवस असणार आहे. कंपनीनं अलीकडेच बीएसईला कळवलंय की कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक १४ ऑगस्ट रोजी निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये, ३० जून २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीचे एकत्रित आर्थिक निकाल १४ ऑगस्ट २०२५ रोजी विचारात घेतले जातील.
हे दिग्गजही रेसमध्ये
कर्जबाजारी असलेल्या इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी जयप्रकाश असोसिएट्स लिमिटेडची मालमत्ता लवकरच विकली जाईल, असं एका रिपोर्टमध्ये म्हटलंय. ऑगस्टच्या मध्यापर्यंत बोली सादर होण्याची शक्यता आहे. दालमिया भारत आणि गौतम अदानी यांच्यासह अनेक दिग्गज कंपन्या कंपनी खरेदी करण्याच्या शर्यतीत आहेत. अलीकडील अहवालानुसार, पुनीत दालमिया समर्थित दालमिया भारत आणि गौतम अदानी यांचे अदानी एंटरप्रायझेस हे जेएएलच्या मालमत्तेसाठी टॉप दोन बोली लावणारे आहेत.
याशिवाय या शर्यतीत इतरांमध्ये खाण क्षेत्रातील दिग्गज अनिल अग्रवाल यांची वेदांता, नवीन जिंदाल समर्थित जिंदाल पॉवर आणि पीएनसी इन्फ्राटेक यांचा समावेश आहे. अलिकडेच, भारतीय स्पर्धा आयोगानं (सीसीआय) जयप्रकाश असोसिएट्स लिमिटेडचे डालमिया सिमेंट (इंडिया) लिमिटेडनं १००% अधिग्रहण करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. सीसीआयनं मंगळवारी या संदर्भात एक आदेश जारी केला होता. जयप्रकाश असोसिएट्स लिमिटेड ही सिमेंटसह रिअल इस्टेट, हॉस्पिटॅलिटी आणि अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (ईपीसी) क्षेत्रात काम करणारी कंपनी आहे. ती सध्या सीआयआरपीच्या प्रक्रियेतून जात आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)