अमेरिका आणि इस्रायलनेइराणवर शनिवारी संयुक्त हल्ला चढवला. या हल्ल्याचा परिणाम भारतासह संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तज्ज्ञांच्या मते, इराणवरील या हल्ल्याने भारतीय शेअर बाजारावरील दबाव मोठ्या प्रमाणावर वाढू शकतो. यामुळे गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर शेअर्सची विक्री करण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
याशिवाय, काही बाजार तज्ज्ञांचे लक्ष इराणच्या प्रतिक्रियेकडे आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांवर इराणची काय प्रतिक्रिया येते आणि तणाव किती काळ टिकतो, यावरच बाजाराची पुढील दिशा अवलंबून असेल, असेही काही तज्ज्ञांचे मत आहे.
कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडण्याची भीती -
इराण हा जगातील प्रमुख तेल उत्पादक देशांपैकी एक आहे. युद्ध अधिक भडकल्यास, पुरवठा साखळी विस्कळीत होऊ शकते. याचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतीवर होऊन, त्यात मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ शकते. सध्या कच्च्या तेलाची किंमत साधारणपणे ६७ डॉलर प्रति बॅरल एवढी आहे. यात आधीच २ टक्क्यांची वाढ झाली आहे. जर हा संघर्ष अधिक चिघळला, तर कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम दिसू शकतो.
या क्षेत्रांना बसू शकतो फटका -
कच्चे तेल महागल्यास देशात महागाई वाढण्याचा धोका आहे. याचा सर्वाधिक फटका ऑईल मार्केटिंग कंपन्यांना बसेल. जर किमतीत मोठी वाढ झाली तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही वाढ होऊ शकते. याशिवाय, कच्च्या तेलावर अवलंबून असणारे पेंट उद्योग, विमान वाहतूक (एव्हिएशन) आणि टायर उत्पादक कंपन्यांच्या नफ्यावर आणि शेअर्सवरही वाईट परिणाम दिसून येऊ शकतो. तसेच, येणाऱ्या काही आठवड्यांत बाजारात मोठी अस्थिरता आणि चढ-उतार पाहायला मिळतील, असाही अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
