नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोने गेल्या दोन दिवसांत ९०० हून अधिक उड्डाणे रद्द केल्यामुळे निर्माण झालेल्या गोंधळाचा फायदा इतर प्रतिस्पर्धी विमान कंपन्यांनी घेण्यास सुरुवात केली आहे. इंडिगोमुळे विमानाचा प्रवास रद्द झालेल्या हजारो प्रवाशांना आता आकासा एअर, एअर इंडिया आणि स्पाइसजेट सारख्या कंपन्यांच्या अवाच्या सवा वाढलेल्या तिकीट दरांचा सामना करावा लागत आहे.
बाजारात उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, मुंबई-दिल्ली, दिल्ली-बेंगळुरू आणि चेन्नई-हैदराबाद यांसारख्या प्रमुख मार्गांवर अचानक मागणी वाढल्यामुळे, प्रतिस्पर्धी कंपन्यांनी आपल्या तिकीट दरांमध्ये दोन ते चार पटीने वाढ केली आहे. ज्या मार्गावर सामान्यतः तिकीट ₹५,००० ते ₹७,००० च्या दरम्यान उपलब्ध होते, तिथे आता तात्काळ प्रवासासाठी ₹१५,००० ते ₹२०,००० इतका दर आकारला जात आहे. मुंबई-दिल्ली विमानाचे तिकीट ३०-३५ हजारांना मिळू लागले आहे. परतीचे तिकीट हवे असेल तर त्यासाठी ५९-६० हजार रुपये मोजावे लागत आहेत.
इंडिगोच्या गोंधळामुळे अडकलेल्या प्रवाशांना कुठलाही पर्याय नसल्यामुळे, नाईलाजाने त्यांना हे वाढलेले दर देऊन प्रवास करावा लागत आहे. या परिस्थितीमुळे 'संकटात संधी' साधण्याचा आणि प्रवाशांची अक्षरशः आर्थिक लूट करण्याचा क्रूर प्रकार सुरू झाला आहे.
नियामक यंत्रणा गप्प
नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) इंडिगोच्या उड्डाणे रद्द करण्याच्या समस्येवर लक्ष ठेवून असले तरी, संकटकाळात इतर कंपन्यांकडून होणाऱ्या या 'किंमत वाढ' किंवा दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाहीये, ज्यामुळे प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. विमान कंपन्यांकडून अशा परिस्थितीत तिकीट दरांची मनमानी केली जात असताना, सरकारने यात त्वरित हस्तक्षेप करण्याची मागणी होत आहे.
