India's Fastest Growing State: देशातील विकसित राज्यांमध्ये महाराष्ट्र, गुजरात, केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटक यांचे नाव आघाडीवर येते. मात्र, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) ताज्या अहवालात एक महत्त्वाचा खुलासा झाला आहे. गेल्या पाच वर्षांत इतर सर्व राज्यांच्या तुलनेत आसामची अर्थव्यवस्था सर्वाधिक वेगाने पुढे सरसावत असून, देशाच्या आर्थिक प्रगतीत ईशान्य भारताचा वाटा लक्षणीयरीत्या वाढला आहे.
2020 ते 2025 दरम्यान 45 टक्के वाढ
RBIच्या स्थिर किमतींवरील सकल राज्य देशांतर्गत उत्पादन (GSDP) आकडेवारीनुसार, 2020 ते 2025 या कालावधीत आसामची अर्थव्यवस्था सुमारे 45 टक्क्यांनी वाढली आहे. ही वाढ इतर राज्यांपेक्षा जास्त असून, याच कालावधीत झालेल्या राष्ट्रीय आर्थिक वाढीपेक्षाही अधिक आहे.
GSDPमध्ये मोठी झेप
2020 मध्ये आसामचा GSDP 2.4 लाख कोटी रुपये होता, जो 2025 मध्ये वाढून 3.5 लाख कोटी रुपये झाला आहे. कृषी क्षेत्रातील सुधारणा, तेल व वायू क्षेत्रातील हालचाल आणि संपूर्ण ईशान्य भागात वाढलेली पायाभूत सुविधांवरील गुंतवणूक यामुळे ही झपाट्याने वाढ शक्य झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. ही प्रगती देशातील आर्थिक विस्तार आता काही मोजक्या राज्यांपुरता मर्यादित न राहता इतर भागांपर्यंत पोहोचत असल्याचे संकेत देते.
राष्ट्रीय पातळीवरील स्थिती
राष्ट्रीय स्तरावर पाहिले असता, भारताचा GDP 2020 मध्ये 145.35 लाख कोटी रुपये होता, जो 2025 मध्ये 187.97 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. याचा अर्थ पाच वर्षांत सुमारे 29 टक्के वाढ झाली आहे. RBIच्या आकडेवारीनुसार, देशातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या टॉप-10 राज्य अर्थव्यवस्थांनी 45 टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवली असून, ही वाढ राष्ट्रीय सरासरीपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आहे.
इतर राज्यांची आर्थिक वाढ
उत्तर प्रदेश : 35 टक्के वाढ; GSDP 11.7 लाख कोटींवरून 15.8 लाख कोटी रुपये
राजस्थान : 34 टक्के वाढ; 6.8 लाख कोटींवरून 9.1 लाख कोटी रुपये
बिहार : 33 टक्के वाढ; 4.0 लाख कोटींवरून 5.3 लाख कोटी रुपये
आंध्र प्रदेश : 33 टक्के वाढ; 6.5 लाख कोटींवरून 8.7 लाख कोटी रुपये
छत्तीसगड : 31 टक्के वाढ; 2.5 लाख कोटींवरून 3.3 लाख कोटी रुपये
झारखंड : 31 टक्के वाढ; 2.3 लाख कोटींवरून 3.0 लाख कोटी रुपये
तेलंगणा : 30 टक्के वाढ; 6.4 लाख कोटींवरून 8.4 लाख कोटी रुपये
