Indian Software Developer : उच्चशिक्षण घेऊन डॉक्टर, इंजिनिअर व्हावे आणि नामांकित कंपन्यांत 'व्हाईट कॉलर' नोकरी करावी, हे कोणाचेही स्वप्न असते. मात्र, २६ वर्षीय मुकेश मंडल या भारतीय तरुणाची गोष्ट थोडी वेगळी आणि थक्क करणारी आहे. व्यवसायाने सॉफ्टवेअर डेव्हलपर असलेला मुकेश सध्या रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग शहरात रस्ते सफाई कर्मचारी म्हणून काम करत आहे. विशेष म्हणजे, रशियाच्या कडाक्याच्या थंडीत रस्ते झाडण्याचे काम करणाऱ्या १७ भारतीय मजुरांच्या टोळीत तो सामील असून, याद्वारे तो दरमहा लाखांहून अधिक कमाई करत आहे.
एआय सोडून हातात झाडू का?
मुकेश मंडलने रशियन मीडिया आऊटलेट 'फोंटांका'शी बोलताना आपला अनुभव सांगितला. तो म्हणतो, "रशियात येण्यापूर्वी मी तंत्रज्ञान क्षेत्रात काम करत होतो. मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्यांच्या तंत्रज्ञानाशी मी निगडित होतो. एआय, चॅटबॉट्स आणि जीपीटी यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानावर मी डेव्हलपर म्हणून काम केले आहे." केवळ पैसे कमवण्याच्या उद्देशाने तो सध्या रशियात आला आहे. "या वर्षी रशियात राहून चांगले पैसे साठवायचे आणि मग पुन्हा मायदेशी परत जायचे, असा माझा प्लॅन आहे," असे मुकेशने स्पष्ट केले.
कामाचे स्वरूप आणि मानधन
मुकेश ज्या 'कोलोम्याजस्कोये' कंपनीत काम करत आहे, त्या कंपनीने भारतातील १७ मजुरांना रशियात आणले आहे. ही कंपनी प्रत्येक मजुराला महिन्याला सुमारे १ लाख रूबल (भारतीय चलनात सुमारे १.१ लाख रुपये) पगार देते. याशिवाय कंपनी कर्मचाऱ्यांच्या राहण्याचा आणि जेवणाचा खर्च उचलते. तसेच कामाच्या ठिकाणी येण्या-जाण्यासाठी वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षेसाठी विशेष कपडेही पुरवते. या ग्रुपमध्ये केवळ मजूरच नाहीत, तर आर्किटेक्ट, ड्रायव्हर, शेतकरी आणि वेडिंग प्लॅनर अशा विविध क्षेत्रांतील १९ ते ४३ वयोगटातील व्यक्तींचा समावेश आहे.
'पेपरवर्क' आणि सुरक्षा महत्त्वाची
कंपनीच्या विभाग प्रमुख मारिया ट्याबिना यांनी सांगितले की, "हे सर्व भारतीय कामगार अतिशय मेहनती आहेत. आम्ही त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यापासून ते त्यांना कामाचे स्वरूप समजावून सांगण्यापर्यंत सर्व जबाबदारी घेतो. त्यांना राहण्यासाठी डॉर्मिटरी आणि दुपारच्या जेवणाचीही सोय केली जाते."
वाचा - कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
जागतिक रोजगाराचे नवे वास्तव
भारतातील उच्चशिक्षित तरुण केवळ पगाराच्या आकड्यासाठी सातासमुद्रापार कोणतीही कष्टाची कामे करण्यास तयार होत आहेत, हे या घटनेतून स्पष्ट होते. सॉफ्टवेअर क्षेत्रातील अनिश्चितता किंवा परदेशात कमी वेळात जास्त पैसे कमवण्याची ओढ, यांमुळे मुकेशसारखे तरुण रशियाच्या रस्त्यांवर उतरले आहेत.
