Indian Railway : तुम्ही जर रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने आपल्या प्रवासी भाड्यात अल्प वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, याचे नवे दर २६ डिसेंबर २०२५ पासून लागू होणार आहेत. वाढती ऑपरेटिंग खर्च आणि पायाभूत सुविधांचा विस्तार लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयाने रविवारी ही घोषणा केली. विशेष म्हणजे, ही वाढ केवळ लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी असून लोकल आणि कमी अंतराचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना यातून दिलासा देण्यात आला आहे.
भाडेवाढीचे नवे गणित
रेल्वेने भाडेवाढ करताना सामान्य माणसाच्या खिशावर मोठा भार पडणार नाही याची काळजी घेतली आहे.
- जनरल क्लास : २१५ किमी पेक्षा जास्त अंतरासाठी प्रति किलोमीटर १ पैशाची वाढ.
- नॉन-एसी (मेल/एक्स्प्रेस) : प्रति किलोमीटर २ पैसे वाढ.
- एसी क्लास (सर्व गाड्या) : प्रति किलोमीटर २ पैसे वाढ.
- जर एखादा प्रवासी नॉन-एसी ट्रेनने ५०० किमीचा प्रवास करत असेल, तर त्याला केवळ १० रुपये अतिरिक्त मोजावे लागतील.
कोणाला दिलासा?
उपनगरीय रेल्वे गाड्यांचे मासिक पास आणि २१५ किलोमीटरपर्यंतच्या जनरल प्रवासासाठी कोणतेही अतिरिक्त भाडे आकारले जाणार नाही. रोज प्रवास करणाऱ्या नोकरदार आणि कामगार वर्गाला महागाईचा फटका बसू नये, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
६०० कोटींच्या महसुलाचे लक्ष्य
या भाडेवाढीमुळे ३१ मार्च २०२६ पर्यंत रेल्वेच्या तिजोरीत ६०० कोटी रुपयांची भर पडण्याची अपेक्षा आहे. या निधीचा विनियोग प्रवाशांची सुरक्षा, रेल्वे रुळांची निगा, स्थानकांचे आधुनिकीकरण आणि गाड्यांमधील सोयीसुविधा वाढवण्यासाठी केला जाणार आहे.
सामानाबाबत कडक नियम
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत स्पष्ट केले की, प्रवाशांना आता आपल्यासोबत ठराविक मर्यादेपेक्षा जास्त सामान नेल्यास अतिरिक्त शुल्क भरावे लागेल.
| प्रवास श्रेणी | विनामूल्य वजन मर्यादा | शुल्कासह कमाल मर्यादा |
| सेकंड क्लास | ३५ किलो | ७० किलो |
| स्लीपर क्लास | ४० किलो | ८० किलो |
| एसी ३-टियर / चेअर कार | ४० किलो | ४० किलो |
| एसी २-टियर / फर्स्ट क्लास | ५० किलो | १०० किलो |
| एसी फर्स्ट क्लास | ७० किलो | १५० किलो |
वाचा - सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
ठराविक मर्यादेपेक्षा जास्त वजन असल्यास प्रवाशांना बुकिंग ऑफिसमध्ये आगाऊ शुल्क भरून परवाना मिळवावा लागेल, अन्यथा दंड आकारला जाईल.
