Indian Economy: पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या प्रत्येकवेळी भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याचा दावा करतात. पण, राज्यांचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होऊ शकत नाही. आता जी आकडेवारी आणि अंदाज समोर आला आहे, त्यातून देशाला विकसित राष्ट्र करण्यात सर्वाधिक योगदान देणाऱ्या राज्यांची नावे समोर आली आहेत. इंडिया रेटिंग्जच्या ताज्या रिपोर्टनुसार, 2047 पर्यंत देशातील 8 राज्यांची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन असेल, असा अंदाज आहे.
या आठ राज्यांच्या यादीत उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांचा समावेश आहे. 2047 पर्यंत देशाची अर्थव्यवस्था 35 ट्रिलियन डॉलर्सची होऊ शकते, असे जागतिक बँकेने आधीच सांगितले आहे.
ती 8 राज्ये कोणती?
इंडिया रेटिंग्स अँड रिसर्च (India-RR) ने सोमवारी आपल्या अहवालात म्हटले की, भारत 2047 पर्यंत विकसित राष्ट्र होण्याच्या मार्गावर असून, देशातील आठ राज्यांचा जीडीपी 1 ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त होण्याचा अंदाज आहे. 28 राज्यांपैकी महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात ही $1 ट्रिलियनचा टप्पा गाठणारी पहिली राज्ये असतील आणि हे आर्थिक वर्ष 2039 मध्ये साध्य होईल. तर, महाराष्ट्र $1 ट्रिलियनचा टप्पा गाठणारे पहिले राज्य असेल. त्यानंतर कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडूचा क्रमांक लागतो. उत्तर प्रदेश आर्थिक वर्ष 2042 पर्यंत हे लक्ष्य गाठू शकेल.
या राज्यांमध्ये दरडोई उत्पन्न कमी
इंडिया रेटिंग्सनुसार, आर्थिक वर्ष 2023 साठी जागतिक बँकेच्या उत्पन्नाच्या वर्गीकरण पातळीनुसार, उच्च-मध्यम उत्पन्न श्रेणीतील गोवा आणि सिक्कीम ही एकमेव राज्ये आहेत (दरडोई उत्पन्न $4,256-13,205). यूपी आणि बिहार कमी-उत्पन्न गटात आहेत (दरडोई उत्पन्न $1,085 पेक्षा कमी). आर्थिक वर्ष 2014 आणि आर्थिक वर्ष 2023 दरम्यान राष्ट्रीय दरडोई उत्पन्नात 4.2 टक्के चक्रवाढ वार्षिक वाढ नोंदवण्यात आली आहे. छत्तीसगड, उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि पंजाबचा विकास दर राष्ट्रीय दरडोई दरापेक्षा कमी होता, तर सात राज्यांचा विकास दर 6 टक्क्यांहून अधिक होता.