भारतीय रिझर्व्ह बँकेची (RBI) अमेरिकन ट्रेझरी बाँड्समधील गुंतवणूक २०० अब्ज डॉलरच्या खाली गेली आहे. ईटीच्या एका रिपोर्टनुसार, केवळ भारतच नाही तर इतर अनेक देशांनीही यूएस ट्रेझरी बाँड्समधील आपली गुंतवणूक कमी केली आहे. अमेरिकन वित्त विभागाच्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर २०२५ च्या अखेरीस भारताकडे १९० अब्ज डॉलरचा परकीय चलन साठा होता. हे गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ५०.७ अब्ज डॉलरनं कमी आहे. दरम्यान, या काळात RBI नं सोन्यातील आपली गुंतवणूक वाढवली आहे. यावरून हे स्पष्ट होतं की, RBI आता आपल्या परकीय चलन साठ्याचं व्यवस्थापन करण्याची पद्धत बदलत आहे.
सोन्याच्या साठ्यात वाढ, डॉलरवरील अवलंबित्व कमी
RBI च्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर २०२५ च्या अखेरीस मध्यवर्ती बँकेकडे ८८०.१८ मेट्रिक टन सोनं होतं, जे एक वर्षापूर्वी ८६६.८ मेट्रिक टन होतं. याच काळात परकीय चलन साठा साधारण ६८५ अब्ज डॉलरवर स्थिर राहिला. आकडेवारीवरून असं दिसून येते की, युनायटेड किंगडम, बेल्जियम, जपान, फ्रान्स, कॅनडा आणि युएई यांसारख्या देशांनी अमेरिकेच्या ट्रेझरी बाँड्समध्ये आपली गुंतवणूक वाढवली आहे. दुसरीकडे चीन, ब्राझील, भारत, हाँगकाँग आणि सौदी अरेबिया यांनी वर्ष दर वर्ष आधारावर आपली गुंतवणूक कमी केली आहे.
सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे कल
२६ सप्टेंबरपर्यंत RBI च्या एकूण परकीय चलन साठ्यात सोन्याचा वाटा १३.६% होता. गेल्या वर्षी याच वेळी हा वाटा ९.३% होता, जेव्हा एकूण साठा विक्रमी पातळीवर होता. जगभरातील मध्यवर्ती बँका सोन्याच्या किमतीत वाढ होऊनही आपल्या साठ्यात सोने वाढवत आहेत. याचं कारण असं की, आर्थिक अनिश्चिततेच्या काळात सोन्याला एक सुरक्षित गुंतवणूक मानलं जातं. रशिया-युक्रेन युद्धानंतर जगातील अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांनी आपली रणनीती बदलली आहे. आता त्या डॉलरवरील आपलं अवलंबित्व कमी करत आहेत आणि सोन्याचा हिस्सा वाढवत आहेत.
तज्ज्ञांचं मत काय?
आयडीएफसी फर्स्ट बँकच्या मुख्य अर्थतज्ज्ञ गौरा सेनगुप्ता यांनी सांगितलं की, "अमेरिकेच्या ट्रेझरी बिलांमधील भारताचा कमी झालेला हिस्सा, RBI सोन्याची खरेदी वाढवून आपल्या परकीय चलन साठ्यात विविधता आणण्याचा प्रयत्न करत असल्याचं दर्शवतो. विकसित देशांमधील वाढत्या आर्थिक दबावामुळे जागतिक बाँड यील्ड वाढली आहे, ज्यामुळे ट्रेझरीमध्ये ठेवलेल्या साठ्याच्या मूल्यांकनात तोट्याचा धोका वाढला आहे. हा धोका मर्यादित करण्यासाठी, RBI सह अनेक मध्यवर्ती बँका आपल्या साठ्याचा काही भाग अमेरिकन ट्रेझरीमधून काढून सोन्याकडे वळवत आहेत."
कोणाची गुंतवणूक सर्वाधिक?
ऑक्टोबर २०२५ च्या अखेरीस, मध्यवर्ती बँकांद्वारे अमेरिकन ट्रेझरी बिलांमध्ये एकूण गुंतवणूक ९.२४ ट्रिलियन डॉलर होती. यामध्ये जपानची गुंतवणूक सर्वाधिक १.२ ट्रिलियन डॉलर होती, त्यानंतर युके (८७७ अब्ज डॉलर) आणि चीनचा (६८८.७ अब्ज डॉलर) क्रमांक लागतो. गेल्या वर्षी ऑक्टोबर अखेरीस चीनची गुंतवणूक ७६०.१ अब्ज डॉलर होती. या काळात ब्राझीलची गुंतवणूक २२८.८ अब्ज डॉलरवरून घटून १६७.७ अब्ज डॉलर झाली आहे.
