India-America Trade Deal: अलिकडेच डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५०० टक्के कर लादण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आता, भारत आणि अमेरिकेतील बहुप्रतिक्षित व्यापार करार (ट्रेड डील) आता निर्णायक वळणावर पोहोचला असल्याचे संकेत मिळाले आहेत. वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या ताज्या विधानावरून असे दिसून येते की, दोन्ही देशातील व्यापार करार अंतिम टप्प्यात पोहोलचा असून, लवकरच औपचारिक घोषणा होऊ शकते.
लवकरच अधिकृत घोषणा?
वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी स्पष्ट केले की, भारत-अमेरिका व्यापार चर्चाा कधीच थांबल्या नव्हत्या. ही एक सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. चर्चा सकारात्मक दिशेने पुढे जात आहे. नुकतीच वाणिज्य मंत्री पीयूष गोयल आणि अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी ग्रीर यांच्यात व्हर्च्युअल बैठक पार पडली.
या बैठकीत चर्चेला सकारात्मक कल मिळाला असून, करार जवळपास तयार असल्याचे संकेत आहेत. मात्र सरकारकडून कोणतीही ठोस तारीख किंवा ‘डेडलाइन’ जाहीर करण्यात आलेली नाही. घाईघाईने तारीख जाहीर करण्याऐवजी, दोन्ही बाजू पूर्णपणे सहमत झाल्यावरच अधिकृत घोषणा केली जाईल, असे अग्रवाल यांनी स्वष्ट केले.
उच्च टॅरिफ असूनही भारतीय वस्तूंना मोठी मागणी
राजेश अग्रवाल यांनी सादर केलेल्या आकडेवारीनुसार, अमेरिकेने उच्च टॅरिफ लागू करूनही भारताची निर्यात मजबूत राहिली आहे. भारत दरमहा सुमारे ७ अब्ज डॉलर्स किमतीचा माल अमेरिकेला निर्यात करत आहे. याचा अर्थ, अमेरिकन बाजारात भारतीय उत्पादनांची मागणी अजूनही कायम आहे. फक्त अमेरिकाच नव्हे, तर चीन आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) यांसारख्या बाजारांमध्येही भारतीय निर्यात चांगली कामगिरी करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
उपलब्ध माहितीनुसार, कापड उद्योग (टेक्सटाईल), समुद्री उत्पादने (सी-फूड), रत्न व दागिने या क्षेत्रांनी उच्च टॅरिफचा ताण असूनही आपली वाढ कायम ठेवली आहे. अमेरिकेत कराचा बोजा वाढूनही या क्षेत्रांतील निर्यातदारांनी लवचिकता दाखवली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानला जाणारा औषधनिर्माण (फार्मा) क्षेत्रानेही नवी दिशा घेतली आहे. भारतीय फार्मा कंपन्या आता केवळ अमेरिकन बाजारावर अवलंबून राहिलेल्या नाहीत. ‘डायव्हर्सिफिकेशन’ धोरणाअंतर्गत भारतीय औषधे आता ब्राझील आणि नायजेरिया यांसारख्या उदयोन्मुख बाजारांत प्रवेश करत आहेत. यामुळे एखादा बाजार अडचणीत आला, तरी भारतीय कंपन्यांसाठी इतर पर्याय खुले राहणार आहेत.
