Budget 2025 Nirmala Sitharaman : १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प मांडणार आहेत. यावेळी करातून दिलासा मिळावा अशी मध्यमवर्गीयांची अपेक्षा आहे. दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कराच्या मुद्द्यावर सामान्यांकडून व्यक्त करण्यात आलेल्या चिंतेवर उत्तर दिलं आहे. मध्यमवर्गीय आणि सरकार त्यांच्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांवर त्यांनी भाष्य केलंय. सरकार करप्रणाली सोपी आणि निष्पक्ष बनवण्याचे प्रयत्न करत आहे. मला आणखी काही गोष्टी करायच्या आहेत, पण काही मर्यादा आहेत, असं निर्मला सीतारामन म्हणाल्या.
सीतारामन यांनी नवी करप्रणालीवर भाष्य केलं, ज्यात कमी टॅक्स रेट आणि कमी सूट आहे. यामुळे करप्रणाली सोपी झाल्याचं त्यांनी म्हटलं. "अनेकांना सूट नकोय, म्हणून आम्ही एक सोपी करप्रणाली घेऊन आलोय," असं त्या म्हणाल्या. टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.
जीएसटीबाबतही मांडली भूमिका
जीएसटीबाबतही सीतारामन यांनी आपली भूमिका मांडली. "जीएसटीमध्ये जीवनावश्यक वस्तूंवर कर लावण्यात आलेला नाही. यापूर्वी राज्यं व्हॅट आणि उत्पादन शुल्काअंतर्गत कर आकारत असत. जीएसटीनं नुकतेच वेगवेगळे कराचे दर एकत्र केले आहेत. यामुळे देशभरात करप्रणाली एकसारखी झाली आहे," असंही त्या म्हणाल्या.
"हे समजावणं कठीण हे आणि कोणालाही नाराज न करता हे कसं सांगावं मला माहीत नाही. मी थेट बोलू इच्छिते. जीएसटीपूर्वी जीवनावश्यक वस्तूंवर कर आकारला जात नव्हता का? यापूर्वी राज्ये यावर वॅट किंवा एक्ससाईजद्वारे टॅक्स लावत होती. टॅक्स लावू नका, बिलकूल लावू नका, हे उत्तम तत्व आहे. पण जीएसटीनं माझ्या साबणावर, तेलावर, फणीवर कर लावला... संपूर्ण सन्मानासह, नाही," असंही सीतारामन म्हणाल्या.
गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न
"जीएसटीपूर्वी या सर्व वस्तू मोफत होत्या आणि आता त्यांच्यावर कर आकारला जातो, असं वाटणं चुकीचं आहे. मी खात्रीने सांगू शकते की जीएसटीनंतर या सर्व गोष्टींवरील कर कमी झाले आहेत. दैनंदिन वस्तूंवरील कर कमी झाल्याचं दर्शविणारी अनेक आकडेवारी मी जाहीर केली आहे. जिथे श्रेय दिलं गेलं पाहिजे, तिकडे ते दिलं पाहिजे," असंही त्यांनी नमूद केलं.
"मीदेखील मध्यमवर्गीय कुटुंबातून येते, जो पगारावरच अवलंबून होता. मला या गोष्टींची समज नाही का, असं तुम्हाला वाटतं का?" असाही सवाल त्यांनी यावेळी केला.