Telangana News : तेलंगणा सरकारने हैदराबादला जागतिक शहर म्हणून विकसित करण्यासाठी एक अनोखी आणि चर्चेत असलेली 'ग्लोबल नेमिंग' मोहीम सुरू केली आहे. मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी शहराच्या काही मोठ्या आणि प्रमुख रस्त्यांची नावे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध व्यक्ती आणि जगातील मोठ्या कंपन्यांच्या नावावर ठेवण्याची घोषणा केली आहे. याचा उद्देश हैदराबादला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणे आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना आकर्षित करणे हा आहे.
टाटांच्या योगदानाचा विशेष सन्मान
सरकारने सर्वप्रथम, प्रमुख उद्योगपती आणि पद्मभूषण पुरस्कार विजेते रतन टाटा यांना सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. नेहरू आऊटर रिंग रोडजवळ राविरियाला येथून सुरू होऊन प्रस्तावित फ्यूचर सिटीला जोडणाऱ्या १०० मीटर रुंदीच्या ग्रीनफिल्ड रेडियल रस्त्याला "रतन टाटा रोड" असे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राविरियाला इंटरचेंजला आधीच "टाटा इंटरचेंज" असे नाव देण्यात आले आहे. टाटा समूहाचे हैदराबादमधील वाढते योगदान यातून अधोरेखित केले जात आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावावर ॲव्हेन्यू
सर्वात जास्त चर्चेत असलेला प्रस्ताव म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावावर मुख्य रस्त्याचे नामकरण करणे. अमेरिकन वाणिज्य दूतावासाच्या समोरील मुख्य रस्त्याचे नाव "डोनाल्ड ट्रम्प ॲव्हेन्यू" ठेवण्याचा प्रस्ताव आहे. जगात पहिल्यांदाच एखाद्या भारतीय शहरात अमेरिकेच्या अध्यक्षांच्या नावावर रस्ता असेल. यामुळे हैदराबादची आंतरराष्ट्रीय ब्रँड व्हॅल्यू वाढेल आणि अमेरिकेसोबतचे व्यापार आणि गुंतवणूक संबंध मजबूत होतील, असा मुख्यमंत्र्यांचा विश्वास आहे.
गुगल स्ट्रीट आणि मायक्रोसॉफ्ट रोडचेही प्रस्ताव
मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी नुकत्याच दिल्लीत आयोजित यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमच्या बैठकीत संकेत दिले की, लवकरच हैदराबादमधील काही महत्त्वाच्या रस्त्यांना जागतिक टेक कंपन्यांची नावे दिली जातील. या योजनेंतर्गत एका रस्त्याला गुगल स्ट्रीट, दुसऱ्याला मायक्रोसॉफ्ट रोड आणि एका महत्त्वाच्या चौकाला विप्रो जंक्शन असे नाव दिले जाण्याची शक्यता आहे.
वाचा - सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारने लोकसभेत दिली 'डेटलाइन'
सरकारचा उद्देश काय आहे?
तेलंगणा सरकारचा दावा आहे की, ज्या व्यक्ती आणि कंपन्यांनी जगात मोठे योगदान दिले आहे, त्यांच्या नावावर रस्त्यांचे नामकरण करणे हे सन्मानाचे प्रतीक आहे. यामुळे हैदराबादला एक आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र म्हणून स्थापित करण्यात मदत होईल. तसेच, ही मोहीम शहरात येणाऱ्या लोकांना प्रेरणा देणारी ठरेल आणि व्यवसायाचे वातावरण मजबूत करेल, असा सरकारचा विश्वास आहे.
