Success Story : आयुष्यात मोठं होण्यासाठी फक्त संसाधने आणि संधी मिळणे पुरेसे नसते, तर संकटांवर मात करण्याची इच्छाशक्ती लागते. तमिळनाडूतील बसवराज एस. यांची कहाणी अशीच प्रेरणादायी आहे. वडिलांनी रागावून दिलेल्या केवळ १,००० रुपयांच्या भांडवलावर या तरुणाने एक यशस्वी आणि 'सस्टेनेबल' स्टार्टअप उभा करून कोट्यवधींचे साम्राज्य निर्माण केले आहे.
नोकरी गेली आणि वडिलांनी घराबाहेर काढले
बसवराज सुरुवातीला नोकरी करत होते, पण एका दिवशी त्यांना नोकरीतून काढून टाकण्यात आले. निराश होऊन ते घरी परतले आणि त्यांनी ही गोष्ट वडिलांना सांगितली. नोकरी गेल्याचे ऐकून वडिलांना खूप राग आला. त्यांनी बसवराज यांना खडसावले आणि हातावर १,००० रुपये ठेवून त्यांना घरातून बाहेर काढले. "काहीतरी मोठा माणूस बनल्याशिवाय घरी परत येऊ नको," असा सक्त दम देत त्यांनी बसवराज यांना बेंगळुरूला पाठवले.
पहिला व्यवसाय आणि कोरोनाचा फटका
केवळ १,००० रुपये आणि काही जुनी बचत घेऊन बसवराज बेंगळुरूला पोहोचले. तिथे त्यांनी 'कँबर प्रॉडक्ट्स अँड सर्व्हिसेस' नावाची आपली पहिली कंपनी सुरू केली. ही कंपनी युनिफॉर्म, सुरक्षा साधने आणि ऑफिसचे सामान पुरवत असे.
व्यवसाय सुरू होताच, कोरोना महामारी सुरू झाली. देशव्यापी लॉकडाउनमुळे त्यांच्या व्यवसायाला मोठा फटका बसला आणि मोठे नुकसान झाले. पण या संकटातूनच त्यांना एक नवीन संधी दिसली.
'राफ्टर'चा जन्म आणि यश
कोरोना काळात बसवराज यांना भेटवस्तू वस्तूंचा व्यवसाय सुरू करण्याची कल्पना सुचली. त्यांनी 'राफ्टर' नावाचा एक सस्टेनेबल गिफ्टिंग स्टार्टअप सुरू केला.
वाचा - रिन्यूएबल्स, डिफेन्ससह फायनान्समधील 'हे' ५ स्टॉक्स देतील जबरदस्त परतावा; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राईज
राफ्टर कंपनी बांबूच्या बाटल्यांपासून ते तांदळाच्या कोंड्यापासून बनवलेले मग यांसारख्या पर्यावरणास अनुकूल वस्तू तयार करते. आजकाल अनेक मोठ्या कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देण्यासाठी अशा 'सस्टेनेबल' वस्तूंना मोठी मागणी करत आहेत. वडिलांनी दिलेल्या १,००० रुपयांच्या आव्हानातून सुरू झालेला बसवराज यांचा हा प्रवास आज कोट्यवधी रुपयांचे यशस्वी बिझनेस मॉडेल बनला आहे.