Defence Stock News : शनिवारी दुबई येथे भारतीय स्वदेशी बनावटीचे फायटर जेट 'तेजस'चा भीषण अपघात झाला. या अपघाताचा परिणाम कंपनीच्या शेअर्सवर पाहायला मिळाला. सोमवारी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी पडझड झाली. दिवसाच्या सुरुवातीलाच कंपनीचे शेअर्स ८ टक्क्यांपर्यंत कोसळले होते. अपघातानंतर गुंतवणूकदारांनी पटापट शेअर्स विकायला सुरुवात केली. परिणामी स्टॉक्स घसरत गेला.
शेअर बाजारात कंपनी 'लाल'
दुबईमध्ये आयोजित एअर शो दरम्यान एचएएलने बनवलेले तेजस फायटर जेट क्रॅश झाले, ज्यात पायलटचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेचा थेट परिणाम सोमवारी बाजारातील कंपनीच्या कामगिरीवर दिसून आला. सकाळी ११:२५ वाजता बीएसईवर कंपनीचा शेअर ३.४४ टक्के किंवा १५८.२० रुपयांच्या घसरणीसह ४,४३६.८० रुपयांवर व्यवहार करत होता. दिवसाच्या सुरुवातीला शेअर ४,२०५.२५ रुपये या नीचांकी पातळीवर उघडला होता. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ५,१६६ रुपये इतका आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजवरही कंपनीचा शेअर १६० रुपयांनी घसरून ४,४३६ रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत होता.
संरक्षण क्षेत्राच्या अपेक्षांना धक्का
तेजस फायटर विमान हे आपल्या परवडणाऱ्या किमतीसाठी जगभर प्रसिद्ध आहे. त्यामुळे अनेक लहान देश हे जेट विकत घेण्यासाठी इच्छुक आहेत. दुबईतील एअर शोमध्ये अनेक संभाव्य ग्राहक देश उपस्थित होते आणि भारताला मोठ्या ऑर्डर मिळण्याची आशा होती.
वाचा - तुमच्या घराचं स्वप्न साकार होणार! PM आवास योजना २०२५ ची नवीन यादी जाहीर; असे तपासा आपले नाव!
मात्र, क्रॅशच्या या दुर्दैवी घटनेमुळे भारताच्या निर्यात अपेक्षांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. याच अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदारांनी एचएएलच्या शेअर्सची विक्री सुरू केल्याने त्यात मोठी घसरण झाली.
