अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील मैत्रीने जागतिक राजकारणात नवा इतिहास घडवला आहे. ट्रम्प यांनी मोदींशी फोनवर चर्चा केल्यानंतर भारतासाठी मोठा निर्णय घेत अमेरिकेने भारतावर लादलेला टॅरिफ २५ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे. या व्यापार करारामुळे भारत-अमेरिका संबंधांत एका नव्या पर्वाची सुरुवात झाली असून, रशिया-युक्रेन युद्धाच्या संदर्भातही भारताने महत्त्वाचे पाऊल उचलण्याचे मान्य केले आहे.
मोदींशी बोललो आणि निर्णय घेतला - ट्रम्प
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या 'ट्रुथ सोशल' या व्यासपीठावर या ऐतिहासिक कराराची घोषणा केली. त्यांनी लिहिले की, "आज सकाळी माझे जवळचे मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलणे झाले, हा माझ्यासाठी सन्मान आहे. मोदींच्या विनंतीवरून आणि त्यांच्याबद्दल असलेल्या आदरापोटी आम्ही अमेरिकेचा 'रेसिप्रोकल टॅरिफ' २५ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय तात्काळ प्रभावाने लागू होईल."
— Rapid Response 47 (@RapidResponse47) February 2, 2026
रशियाचे तेल बंद, अमेरिका आणि व्हेनेझुएलाला पसंती
या कराराचा सर्वात मोठा परिणाम रशिया-युक्रेन युद्धावर होणार असल्याचे ट्रम्प यांनी सुचवले आहे. ट्रम्प यांच्या दाव्यानुसार, भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणे बंद करणार आहे. त्याऐवजी भारत अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्याकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करेल. "यामुळे युक्रेनमध्ये दर आठवड्याला हजारो लोकांचे बळी घेणारे युद्ध संपवण्यास मदत होईल," असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.
५०० अब्ज डॉलरचा 'बाय अमेरिकन' संकल्प
पंतप्रधान मोदींनी या करारानुसार अमेरिकेकडून ऊर्जा, तंत्रज्ञान, कृषी आणि कोळसा यांसारख्या विविध क्षेत्रांत ५०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीची खरेदी करण्याचे आश्वासन दिले आहे. याला ट्रम्प यांनी 'बाय अमेरिकन' धोरणाचे यश मानले आहे. दुसरीकडे, भारत देखील अमेरिकन वस्तूंवर असलेले आपले टॅरिफ आणि व्यापार अडथळे टप्प्याटप्प्याने शून्य करण्याच्या दिशेने काम करणार आहे.
"आम्ही काम करून दाखवणारे नेते"
ट्रम्प यांनी मोदींचे कौतुक करताना म्हटले की, "पंतप्रधान मोदी आणि मी, आम्ही दोघेही केवळ बोलत नाही तर प्रत्यक्ष काम करून दाखवतो. बहुतेक नेत्यांच्या बाबतीत असे म्हणता येत नाही." या कराराने केवळ व्यापारच नाही, तर जागतिक स्तरावर भारताचे धोरणात्मक महत्त्वही अधोरेखित केले आहे.
