Sundar Pichai AI Warning : जगात सध्या सगळीकडे एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा बोलबाला सुरू आहे. त्यामुळे एआयमध्ये गुंतवणूक करण्यात चढाओढ सुरू झाली आहे. अशात जगातील आघाडीची टेक कंपनी गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआय बाबत वापरकर्त्यांना एक गंभीर इशारा दिला आहे. वापरकर्त्यांनी एआयवर अंधविश्वास ठेवू नये, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर, सध्या एआय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या गुंतवणुकीला त्यांनी 'फुगा' असे म्हटले आहे, जो कधीही फुटू शकतो. याचा परिणाम जगातील प्रत्येक कंपनीवर होईल आणि त्यापासून गुगलही अलिप्त राहणार नाही, असे मत त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त केले आहे.
सुंदर पिचाई काय म्हणाले?
पिचाई यांनी स्पष्ट केले की, एआय अजूनही अनेक चुका करत आहे आणि वापरकर्त्यांनी एआयचा वापर पर्यायी माहिती देणारे साधन म्हणूनच करायला हवा. माहिती मिळवण्यासाठी पूर्णपणे एआयवर अवलंबून राहणे योग्य नाही. एआय क्षेत्रात सध्या मोठ्या प्रमाणावर होणारी गुंतवणूक हा एक फुगा आहे, जो कधीही फुटू शकतो. याचा थेट परिणाम संपूर्ण टेक उद्योगावर होईल. पिचाई म्हणाले की, लोक आजही गुगल सर्चचा वापर अचूक माहिती मिळवण्यासाठी करतात. गुगलकडे अशी उत्पादने आहेत, जी माहितीच्या बाबतीत एआयपेक्षा अधिक विश्वासार्ह आहेत. एआय सर्जनशील कामांमध्ये मदत करू शकते. परंतु, वापरकर्त्यांना त्याच्या मर्यादा माहिती असाव्यात. लोकांनी एआय टूल्सचा योग्य वापर करायला शिकले पाहिजे आणि त्याच्या प्रत्येक गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवू नये.
वाचा - SIP मध्ये 'ही' चूक कराल तर मोठं नुकसान! फक्त ३ पेमेंट मिस झाल्यास १.५ लाख रुपये बुडतील; पाहा गणित
गुगलची भविष्यातील AI रणनीती
सुंदर पिचाई यांच्या मते, गुगलची एआय धोरण मजबूत आहे, कारण कंपनी आपली बहुतेक तंत्रज्ञान स्वतः तयार करते आणि त्यावर कंपनीचेच नियंत्रण आहे. चिप्स, डेटा, एआय मॉडेल आणि संशोधन यांसारख्या गोष्टी गुगल स्वतः करत असल्यामुळे, एआय मार्केटमध्ये येणाऱ्या आव्हानांचा सामना करताना गुगलला इतर कंपन्यांपेक्षा वरचढ ठरण्याची संधी मिळते. गुगल ब्रिटनमध्येही आपली पकड मजबूत करत आहे. कंपनी पुढील दोन वर्षांत तिथे संशोधन आणि पायाभूत सुविधांवर ५ अब्ज पाउंड (सुमारे ५०,००० कोटी रुपये) गुंतवणूक करण्याची तयारी करत आहे. यावरून गुगल एआय आणि पायाभूत सुविधांच्या विस्तारामध्ये किती गंभीर आहे, हे दिसून येते.
