पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारसाठी दोन दिवसांतच चार चांगल्या बातम्या आल्या आहेत. एका बाजूला किरकोळ ते घाऊक महागाई दरात मोठी घसरण झाली आहे, ज्यामुळे सामान्य देशवासीयांना दिलासा मिळाला आहे. तर दुसऱ्या बाजूला अनेक मुद्द्यांवर अडकलेल्या अमेरिका आणि भारतादरम्यानचा व्यापार करार (India-US Trade Deal) पुढे जाण्याचे संकेत मिळाले आहेत. काय आहेत या चार महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊ.
पहिली गुड न्यूज: किरकोळ महागाई कमी झाली
पहिली चांगली बातमी गेल्या कामकाजाच्या दिवशी महागाईशी संबंधित आली. सरकारनं सप्टेंबर महिन्यात किरकोळ महागाई दराचे आकडे सादर केले, जे दिलासादायक होते. महागाईच्या आघाडीवर सामान्य माणसाला मोठा दिलासा मिळाला आहे, कारण ग्राहक किंमत निर्देशांक घसरून १.५४ टक्क्यांवर आला आहे. जून-२०१७ नंतरचा किरकोळ महागाई दराचा हा सर्वात खालचा स्तर आहे. म्हणजेच, सुमारे ९९ महिन्यांमध्ये सर्वात कमी महागाई दर सप्टेंबर महिन्यात नोंदवला गेलाय. खाद्यपदार्थ स्वस्त झाल्यामुळे किरकोळ महागाईत ही घसरण झाली आहे. यापूर्वी ऑगस्टमध्ये यात किरकोळ वाढ होऊन तो २.०७% वर पोहोचला होता.
दुसरी गुड न्यूज: घाऊक महागाईही कमी झाली
मोदी सरकारसाठी दुसरी चांगली बातमीही महागाईच्या आघाडीवर आली आहे. किरकोळ महागाईनंतर मंगळवारी सरकारनं देशातील घाऊक महागाई दराचे आकडे जारी केले आहेत. सप्टेंबर महिन्यात यातही घसरण झाली असून ती ०.१३ टक्क्यांवर आली आहे. यापूर्वी ऑगस्टमध्ये घाऊक किंमत निर्देशांक ०.५२ टक्के नोंदवला गेला होता. सरकारनं आकडे जारी करताना सांगितलं की, विशेषतः खाद्य उत्पादनं, मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट्स, नॉन-फूड उत्पादनांच्या किंमती कमी झाल्यामुळे घाऊक महागाईत घसरण झाली आहे.
तिसरी गुड न्यूज: भारत-US व्यापार करारावर मोठे अपडेट
सोमवारी किरकोळ महागाई दराच्या आकडेवारीसोबतच भारत आणि अमेरिकेदरम्यान अडकलेल्या व्यापार कराराबाबत मोठे अपडेट आले आहे. त्यानुसार, यावर सकारात्मक चर्चा होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांत अमेरिकेच्या वाटाघाटीसाठीचं शिष्टमंडळ नवी दिल्लीत पोहोचलं होतं, तर आता याच आठवड्यात भारतीय टीम देखील अमेरिकेला जाणार आहे. पीटीआयन (PTI) एका अधिकाऱ्याच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार, दोन्ही देशांमध्ये व्यापार करारावर चर्चा योग्य दिशेने पुढे जात आहे आणि त्यात अडकलेले मुद्दे सोडवण्यासाठी आता पुढील फेरीसाठी भारतीय टीम याच आठवड्यात अमेरिकेचा दौरा करणार आहे.
चौथी गुड न्यूज: IMF म्हणाले- 'भारत ग्रोथ इंजिन...'
दोन दिवसांच्या आत चौथी चांगली बातमी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (IMF) आली आहे. आयएमएफच्या प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जीवा यांनी जगात सर्वात वेगानं पुढे सरकणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या गतीचं कौतुक केलंय. त्यांनी IMF-World Bank च्या वार्षिक बैठकीपूर्वी म्हटलं की, गेल्या काही वर्षांत जागतिक विकासाचे पॅटर्न बदलले आहेत आणि भारत आता ग्लोबल ग्रोथ इंजिन म्हणून विकसित होत आहे. यासोबतच त्यांनी भारताची प्रशंसा करताना म्हटलंय, भारताबाबत अनेक मुद्द्यांवर शंका व्यक्त करणारे सरकारच्या धाडसी आर्थिक धोरणांमुळे चुकीचे ठरले आहेत.
