Eicher Motors Share Rise : तुम्ही बाईक लव्हर असाल, तर तुमच्याही फेव्हरेट बाईक लिस्टमध्ये नक्कीच रॉयल एनफिल्डची Classic किंवा Bullet चा समावेश असेल. या बाईक बनवणाऱ्या कंपनीसाठी आज एक चांगली बातमी आहे. आज सकाळी शेअर बाजार (Share Market) सुरू होताच रॉयल एनफिल्डची पॅरेंट कंपनी आयशर मोटर्सच्या (Eicher Motors) शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली. एका दिवसात कंपनीचा शेअर 5 टक्क्यांहून अधिक वधारला. मोठी बाब म्हणजे, गेल्या चार वर्षांपासून हा शेअर सातत्याने गुंतवणूकदारांना चांगली कमाई करुन देत आहे.
शेअरने गाठला उच्चांक
बुधवारी शेअर बाजार हिरव्या चिन्हावर सुरू झाला आणि यासोबतच आयशर मोटर्स लिमिटेडचा शेअरही 3821 रुपयांच्या वाढीसह उघडला. अवघ्या 15 मिनिटांच्या ट्रेडिंगमध्ये हा शेअर 5 टक्क्यांहून अधिक वधारला आणि 3940 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला. बाजार बंद होईपर्यंत शेअरची गती मंदावली, परंतु तरीही आयशर मॉर्टर्सचा शेअर 4.25 टक्क्यांच्या वाढीसह किंवा 158 रुपयांच्या वाढीसह 3875 रुपयांच्या पातळीवर पोहचला.
ब्रोकरेजने दिले 5,000 रुपयांचे लक्ष्य
बुलेट उत्पादक कंपनी आयशर मोटर्सच्या शेअर्सबद्दल बोलताना ब्रोकरेज हाऊस UBS ने याला बाय रेटिंग दिले आहे. इतकंच नाही, तर यूबीएसने आयशॉप मोटर्सच्या शेअर्सची नवीन टार्गेट प्राईस सेट केली आहे. ब्रोकरेज हाऊसनुसार, हा शेअर 5,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. विशेष बाब म्हणजे, 1 जानेवारी 1999 रोजी आयशर मोटर्सच्या एका शेअरची किंमत फक्त 1 रुपये होती. सध्या कंपनीचे बाजार भांडवल (Eicher Motors MCap) 1.06 लाख कोटी रुपये आहे.
स्टॉकच्या कामगिरीवर एक नजर
आयशर मोटर्सच्या शेअर्सच्या कामगिरीवर नजर टाकल्यास, कंपनीने गेल्या चार वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 200 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. 3 एप्रिल 2020 रोजी कंपनीच्या शेअरची किंमत 1268 रुपये होती, जी आतापर्यंत तीन पटीने वाढली आहे. आयशर मोटर्सच्या शेअर्सने गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना 32 टक्के आणि गेल्या सहा महिन्यांत 13 टक्के परतावा दिला आहे.
(नोट- शेयर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)