Gold Silver Rate Today: सोने आणि चांदीच्या भावात आज बुधवारी मोठा बदल पाहायला मिळाला. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) मते, सोने-चांदीच्या दरात आज मोठी वाढ झाली. आज २४ कॅरेट सोन्याचा भाव १,४४,६४३ रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. यापूर्वी मंगळवारी हा भाव १,४०,४२० रुपये होता, म्हणजेच आज सोन्याच्या दरात ४,२२३ रुपयांची वाढ झाली आहे. २२ कॅरेट सोन्याचा विचार केला तर, आज त्याचा भाव १,३८,९५४ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला असून त्यात ४,२०६ रुपयांची तेजी दिसून आली आहे. सोमवारी याची किंमत १,३९,८५८ रुपये होती.
त्याचप्रमाणे, १८ कॅरेट सोनं आज बुधवारी १,३२,४९३ रुपये प्रति १० ग्रॅम दराने विकलं जात आहे. याची आधीची बंद किंमत १,२८,६२५ रुपये होती, म्हणजेच आज ते ३,८६८ रुपयांनी महाग झालं आहे. दरम्यान, bullions.co.in नुसार, २४ कॅरेट सोन्याच्या दरात ५,५१० रुपयांची वाढ नोंदवली गेली असून ते १,४४,९५० रुपये प्रति १० ग्रॅमवर विकलं जात आहे.
१ लाखांचे झाले ५४ लाखांपेक्षा अधिक; 'या' ऑटो स्टॉकनं केलं मालामाल; १२००% डिविडेंड देण्याची घोषणा
चांदीच्या किमतीत ९,००० रुपयांची वाढ
IBJA च्या आकडेवारीनुसार, चांदीच्या किमतीचा विचार केल्यास आज एक किलो चांदीची किंमत २,३३,५५१ रुपये आहे. यापूर्वी मंगळवारी चांदी २,२४,५४५ रुपये प्रति किलो दरानं विकली जात होती. म्हणजेच आज चांदीच्या दरात प्रति किलो ९,००६ रुपयांची वाढ झाली आहे. दुसरीकडे, bullions.co.in वर चांदी २,३६,७९० रुपये प्रति किलो दरानं विकली जात असून त्यात १२,०५० रुपयांची तेजी दिसून आली आहे. विशेष म्हणजे IBJA दिवसातून दोनदा सोने-चांदीचे दर जाहीर करते.
तज्ज्ञांचे मत काय?
बाजार तज्ज्ञांच्या मते, अमेरिका-इराणमधील भू-राजकीय तणाव आणि जागतिक स्तरावर वाढती महागाई यामुळे गुंतवणूकदार सोने-चांदीसारख्या सुरक्षित पर्यायांकडे आकर्षित झाले आहेत. काही प्रमाणात तणाव कमी होण्याचे संकेत मिळत असले तरी अनिश्चितता अजूनही कायम आहे. दिल्ली, मुंबई, बंगळुरू, कोलकाता आणि चेन्नईसह देशातील प्रमुख शहरांमध्येही सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. विविध शहरांमधील कर आणि इतर शुल्कांमुळे किमतींमध्ये थोडा फरक असू शकतो. तज्ज्ञांच्या मते, येणाऱ्या काळात आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि महागाईच्या आकडेवारीनुसार सोन्या-चांदीच्या किमतीत चढ-उतार सुरूच राहू शकतात.
