Gold-Silver Price: २००८ च्या आर्थिक संकटानंतरची सर्वात मोठी मासिक घसरण पाहिल्यानंतर आता सोन्यात पुन्हा चमक दिसू लागली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत जोरदार सुधारणा पाहायला मिळाली. सोन्यानं पुन्हा एकदा $४,६०० चा महत्त्वाचा स्तर ओलांडला असून, चांदीच्या किमतीत ३ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. गेल्या महिनाभरापासून बाजार दबावाखाली असल्यानं या अचानक आलेल्या तेजीने गुंतवणूकदारांना थक्क केलंय.
कॉमेक्सवर सोन्याचा भाव १.२५% वाढून ४,६१८ डॉलर्स प्रति औंसवर पोहोचला. आशियाई व्यापारी तासांमध्ये चांदीच्या किमती ३.७% च्या उडीसह ७३.२ डॉलर्स प्रति औंसवर गेल्या. बाजार तज्ज्ञांच्या मते, १५% च्या मोठ्या घसरणीनंतर सोनं त्याच्या खालच्या स्तरावर अत्यंत आकर्षक झालं होतं. गुंतवणूकदार या घसरणीकडे खरेदीची मोठी संधी म्हणून पाहत आहेत, ज्यामुळे खालच्या स्तरावर मोठी खरेदी झाली आणि किमतींना आधार मिळाला.
मध्य पूर्वेतील तणावाचा परिणाम
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, सोने-चांदीच्या या तेजीमागे मध्य पूर्वेतील (Middle East) वाढता तणाव हे सर्वात मोठं कारण आहे. व्हाईट हाऊसनं इराणवरील हल्ले अधिक तीव्र करण्याचे दिलेले संकेत आणि इराणची कडक भूमिका यामुळे जागतिक आर्थिक बाजारपेठांमध्ये भीतीचं वातावरण आहे. याशिवाय दुबईत कुवेतच्या तेल टँकरवर झालेला हल्ला आणि हूती बंडखोरांच्या सक्रियतेमुळे तेल पुरवठ्यावर नवीन संकट निर्माण झालंय. जेव्हा जगात युद्ध किंवा राजकीय अस्थिरता वाढते, तेव्हा गुंतवणूकदार आपला पैसा शेअर बाजारातून काढून सोन्यात लावतात, कारण सोनं हे सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते.
फेडरल रिझर्व्हचे संकेत
किमतीत वाढ होण्याचं दुसरं मोठं कारण म्हणजे अमेरिकन मध्यवर्ती बँक 'फेडरल रिझर्व्ह'चे विधान. फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी संकेत दिले आहेत की, मध्य पूर्वेतील तणाव असूनही अमेरिकेतील दीर्घकालीन महागाई सध्या नियंत्रणात आहे. केंद्रीय बँक सध्या 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत असल्याचं त्यांनी सांगितलं. या विधानामुळे व्याजदरात सध्या कोणतीही अचानक किंवा मोठी वाढ होणार नाही, असा दिलासा गुंतवणूकदारांना मिळाला आहे, जे सोन्यासाठी सकारात्मक लक्षण आहे.
सोनं ४,८०० डॉलर्स पर्यंत जाईल का?
ऑगमोंटच्या रिसर्च हेड रेनिशा चैनानी यांच्या मते, पुढच्या आठवड्यात सोनं ४,३०० ते ४,६०० डॉलर्सच्या दरम्यान राहू शकते. जर डॉलर कमकुवत झाला किंवा फेडरल रिझर्व्हची भूमिका मवाळ राहिली, तर सोनं लवकरच ४,७०० ते ४,८०० डॉलर्सच्या पातळीला स्पर्श करू शकते. चांदीमध्ये चढ-उतार जास्त असतील आणि ती ६५ ते ७५ च्या मोठ्या मर्यादेत व्यवहार करू शकते.
एनरिच मनीचे सीईओ पोनमुडी आर यांचं म्हणणं आहे की, सोने त्याच्या शॉर्ट-टर्म मूव्हिंग एव्हरेजच्या वर असलं तरी, बाजारपेठेची एकंदरीत रचना अजूनही थोडी कमकुवत आहे. युद्धामुळे मिळणारा पाठिंबा मर्यादित असू शकतो, त्यामुळे सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे.
