Gold-Silver Price : गेल्या काही काळापासून नवनवे उच्चांक प्रस्थापित करणाऱ्या सोने आणि चांदीच्या किमतींना या आठवड्यात मोठा ब्रेक लागला आहे. मध्य आशियातील इराण-इस्रायल युद्ध आणि जागतिक आर्थिक घडामोडींमुळे गुंतवणूकदारांनी सोन्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. अवघ्या एका आठवड्यात सोन्याच्या भावात प्रति १० ग्रॅम १३,७०० रुपयांची प्रचंड घसरण झाली आहे, तर चांदी प्रति किलो तब्बल ३२,७०० रुपयांनी स्वस्त झाली आहे. टक्केवारीच्या भाषेत सांगायचे तर, सोन्यात ८.४७% आणि चांदीमध्ये १२.४०% ची मोठी पडझड झाली आहे.
किमतींमधील बदल: १ मार्च ते आजपर्यंत
२४ कॅरेट सोने : १ मार्च रोजी १,७३,०९० रुपयांच्या उच्चांकावर असलेले सोने आता १,४५,९७० रुपयांवर आले आहे.
चांदी : महिन्याच्या सुरुवातीला ३,१५,००० रुपयांवर असलेली चांदी आता २,४५,००० रुपयांपर्यंत खाली घसरली आहे.
सोन्या-चांदीचा 'भाव' का उतरला?
- अमेरिकन फेडरल रिझर्व्हचा पवित्रा : अमेरिकेत व्याजदर अपेक्षेपेक्षा जास्त काळ चढे राहण्याचे संकेत मिळाल्याने गुंतवणूकदार सोन्याऐवजी डॉलरकडे वळले आहेत.
- चीनची माघार : जगातील सोन्याचा सर्वात मोठा खरेदीदार असलेल्या 'पीपल्स बँक ऑफ चायना'ने सोन्याची खरेदी थांबवली आहे. यामुळे जागतिक बाजारात मागणी घटली असून नफेखोरी वाढली आहे.
- डॉलरची मजबूती : आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर वधारल्याने इतर देशांसाठी सोने खरेदी महाग झाली आहे, परिणामी मागणीत घट होऊन किमती दबावात आल्या आहेत.
- महागाई आणि कच्च्या तेलाचा भडका : कच्चे तेल १०० डॉलरच्या वर गेल्याने आणि ऊर्जा क्षेत्रातील महागाई वाढल्याने बाजाराचे लक्ष सोन्यावरून हटून महागाई नियंत्रणाकडे वळले आहे.
'होर्मुज सामुद्रधुनी'चा अडथळा
मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे कमोडिटी ॲनालिस्ट मानव मोदी यांच्या मते, "जागतिक तणाव असूनही सोन्यावर दबाव आहे कारण बाजार आता दीर्घकाळ चढे राहणारे व्याजदर आणि वाढत्या महागाईवर लक्ष केंद्रित करत आहे. होर्मुज सामुद्रधुनीतील अडथळ्यांमुळे कच्च्या तेलाच्या किमती चार वर्षांच्या उच्चांकावर आहेत, ज्यामुळे ऊर्जा-जनित महागाईची चिंता वाढली आहे."
गुंतवणूकदारांनी आता काय करावे?
- मार्केट गुरु अनिल सिंघवी यांनी गुंतवणूकदारांना सध्या सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.
- घाई नको : सध्या सोन्याची मोठी खरेदी टाळावी. बाजार अजून खाली जाण्याची शक्यता असल्याने तळ गाठण्याची वाट पाहावी.
- तुकड्यांत गुंतवणूक : एकरकमी गुंतवणूक करण्याऐवजी येणाऱ्या काही आठवड्यांत किंवा महिन्यांत 'एसआयपी'च्या माध्यमातून थोडे थोडे सोने खरेदी करणे हिताचे ठरेल.
- अस्थिरता कायम : डॉलर इंडेक्स आणि कच्च्या तेलातील चढ-उतार पाहता, आगामी काळातही सोन्या-चांदीच्या दरात अस्थिरता राहू शकते.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
