जळगाव : सोने ४०० रुपयांनी तर चांदी ६०० रुपयांनी स्वस्त झाल्याने अनेक ग्राहकांनी अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येचा मुहूर्त साधत दागिन्यांची खरेदी केली. त्यामुळे दुपारनंतर सुवर्णनगरीतील सराफी बाजारात ग्राहकांची वर्दळ चांगलीच वाढली होती.
दरम्यान, अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर जळगावच्या सोने-चांदीच्या बाजारात १५ ते २० तर राज्यात ३ हजार कोटींपर्यंत उलाढाल होईल, असा विश्वास सराफी व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे, अनेकांनी अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येलाच सोने खरेदीसाठी सराफी बाजार गाठला. पारंपारिकसह कलाकुसरीच्या दागिन्यांच्या खरेदीकडे ग्राहकांचा सर्वाधिक कल असल्याचे दिसून येत आहे. त्याचबराेबर साेन्याचे वळे आणि नाणी यांचीही खरेदी हाेण्याची शक्यता आहे.
सोने : गुरुवारी सोन्याचे प्रति तोळा ६१ हजार रुपये दर होते. शुक्रवारी मात्र ४०० रुपयांनी दर घसरले आणि सोने ६० हजार ६०० रुपयांवर आले. तर
चांदी : शुक्रवारी ६०० रुपयांनी घसरण झाली. गुरुवारी ७५,८०० रुपये प्रतिकिलोचा दर असणारी चांदी शुक्रवारी ७५,२०० रुपयांवर आली होती.
फसवणूक टाळण्यासाठी या टिप्स
हॉलमार्क तपासून घ्या :
१ एप्रिलपासून ६ अंकी अल्फान्यूमरिक हॉलमार्क लागू झाला आहे. हॉलमार्कवरून सोन्याची शुद्धता कळते. १८ ते २२ कॅरेटचे सोने यात असते. त्यामुळे सोने खरेदीपूर्वी हॉलमार्क तपासून घ्यायला विसरू नका.
नक्षीकाम महाग पडू शकते
सोन्याच्या दागिन्यावर नक्षीकाम (मीनाकारी) आहे म्हणून भाळून जाऊ नका. कारण यात वापरण्यात आलेल्या रंगांचे ५ ते १२ टक्के वजनही सोन्यासोबत जोडले जाते. दागिने मोडताना या वजनाचे कोणतेही पैसे मिळत नाहीत.
घडणावळीत होऊ शकते घासाघीस
दागिन्यांच्या घडणावळीकडेही नीट लक्ष द्या. घडणावळ ही दागिन्याच्या किमतीच्या १० टक्क्यांपर्यंत असते. ती घासाघीस करून कमी केली जाऊ शकते. मोडताना घडणावळीचे पैसेही मिळत नसतात.
सोन्याच्या किमतीत खडे घेऊ नका
अंगठ्या, कानातले टॉप्स यात सजावटीसाठी खडे (नगिने) लावतात. खड्यांच्या या झगमगाटास भुलू नका. खड्यांचे वजन दागिन्याच्या तुलनेत ५ ते १५ टक्के असते. नेहमी त्यांची किंमत वगळूनच दागिने खरेदी करा.