इराण युद्ध सुरू होण्यापूर्वी, २३ फेब्रुवारी २०२६ रोजी जागतिक तेल बाजार स्थिर होता, मात्र त्यानंतर परिस्थिती वेगाने बदलली आहे. 'globalpetrolprices.com' च्या ताज्या आकडेवारीनुसार, जगातील अनेक देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. विशेषतः आशियाई आणि विकसनशील देशांमध्ये इंधन दरांनी विक्रमी पातळी ओलांडली. मात्र असे असतानाही भारत आणि काही मोजक्या देशांमध्ये अद्यापही दर स्थिर आहेत.
ज्या देशांमध्ये इंधन बाजार पूर्णपणे खुला (Open Market) आहे, तेथे किमती वेगाने बदलल्या आहेत. मात्र, जेथे सरकार किमती नियंत्रित करते, तिथे हा परिणाम हळूहळू दिसून येतो. दरवाढीचा सर्वाधिक फटका फिलिपिन्सला बसला असून तिथे डिझेल ८१.६% आणि पेट्रोल ५४.२% महागले आहे. नायजेरियात डिझेल ७८% आणि पेट्रोल ५८.२% तर म्यानमार, कंबोडिया आणि लाओस सारख्या देशांमध्येही ७०% पर्यंत भाव वाढ झाली आहे. तसेच, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेतही ३०% ते ५०% पर्यंत वाढ झाली आहे. युरोपमध्ये जर्मनी, फ्रान्स आणि स्वीडनमध्ये डिझेलच्या किमती ४० टक्क्यांनी वधारल्या आहेत. शेजारील पाकिस्तान आणि श्रीलंकेतही पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत २५ ते ३० टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
भारतात किमती स्थिर! का? -
आशियात पुरवठ्याचा तुटवडा जाणवत असतानासुद्धा भारतात अद्यापही दरवाढ झालेली नाही. याचे मुख्य कारण म्हणजे, भारत सरकार इंधन दरांवर नियंत्रण ठेवते. आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतार तात्पुरते आहेत की कायमस्वरूपी, हे पाहूनच सरकार निर्णय घेते. गरज पडल्यास कर कपात करून किमती स्थिर ठेवल्या जातात. याशिवाय, सौदी अरेबिया, कुवैत आणि बांगलादेशातही सध्या दर स्थिर आहेत. महत्वाचे म्हणजे, फिजी, उरुग्वे, झांम्बिया आदी देशांमध्ये तर, तेलाच्या किंमतीत काहीशी घसरणही दिसून आली आहे.
