Fuel Crisis in India: अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धविरामाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. सुमारे ७ वर्षांनंतर इराणकडून कच्च्या तेलाची खेप भारतीय किनाऱ्यावर पोहोचली आहे. शिप ट्रॅकिंग डेटानुसार, इराणी तेल घेऊन आलेले दोन मोठे सुपरटँकर(जहाज) भारतात दाखल झाले आहेत.
किती तेल आले?
मिळालेल्या माहितीनुसार, फेलिसिटी (Felicity) नावाचा टँकर रविवारी (१२ एप्रिल २०२६) उशिरा रात्री गुजरातच्या सिक्का बंदराजवळ पोहोचला. या टँकरमध्ये सुमारे २० लाख बॅरल कच्चे तेल असून, ते मार्चच्या मध्यात खार्ग बेटावरून लोड करण्यात आले होते. तर, जया (Jaya) नावाचा दुसरा टँकर ओडिशातील पारादीप बंदरात पोहोचला. या टँकरमध्येही जवळपास २० लाख बॅरल तेल आहे, जे फेब्रुवारीच्या अखेरीस लोड करण्यात आले होते
...यामुळे शक्य झाली डिलिव्हरी
या तेलवाहतुकीमागे अमेरिकेकडून काही काळासाठी दिलेली निर्बंधातील सवलत कारणीभूत ठरली. या सवलतीचा उद्देश जागतिक तेलटंचाई कमी करणे आणि वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवणे हा होता. मात्र, शांतता चर्चा अपयशी ठरल्यानंतर अमेरिकेने पुन्हा कडक भूमिका घेतली असून, इराणच्या तेल निर्यातीवर निर्बंध आणखी कडक करण्याचे संकेत दिले आहेत.
कोणी खरेदी केले तेल?
या टँकरमधील तेल नेमके कोणत्या कंपनीने खरेदी केले, याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र: पारादीप बंदर प्रामुख्याने Indian Oil Corporation च्या नियंत्रणाखाली आहे, तर सिक्का बंदर हे Reliance Industries आणि Bharat Petroleum साठी महत्त्वाचे केंद्र आहे. इंडियन ऑइलने यापूर्वी निर्बंध सवलतीदरम्यान एक इराणी तेल खेप खरेदी केल्याची पुष्टी केली होती.
पेमेंट अडचणींमुळे आधीची खेप वळवली
याआधी ‘पिंग शुन’ नावाचा टँकर सुमारे ६ लाख बॅरल इराणी तेल घेऊन गुजरातमधील वाडिनारकडे येत होता. मात्र, पेमेंटसंबंधित अडचणींमुळे हा टँकर भारतात न येता चीनकडे वळवण्यात आला.
भारत-इराण तेल व्यापाराचा इतिहास
एक काळ असा होता की भारत मोठ्या प्रमाणात इराणकडून तेल आयात करत होता. भारताच्या एकूण तेल आयातीत इराणचा वाटा सुमारे ११.५% होता. २०१८ मध्ये भारत इराणकडून दररोज सुमारे ५.१८ लाख बॅरल तेल खरेदी करत होता. मात्र, २०१९ मध्ये हे प्रमाण २.६८ लाख बॅरल प्रतिदिन झाले. त्यानंतर अमेरिकन निर्बंधांमुळे आयात पूर्णपणे बंद झाली.
पुढे काय?
सध्या अंदाजे ९५ मिलियन बॅरल इराणी तेल समुद्रातील टँकरमध्ये साठवलेले आहे. त्यापैकी सुमारे ५१ मिलियन बॅरल भारताकडे येऊ शकते, तर उर्वरित तेल चीन आणि दक्षिण-पूर्व आशियाई देशांकडे वळण्याची शक्यता आहे.
