Helicopter Farmer : आजच्या काळात शेती करणे म्हणजे हाताने नुकसान करुन घेणे, असं बोललं जातं. अशा स्थितीत जर तुम्हाला सांगितलं की स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मॅनेजर असलेल्या व्यक्तीने नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला तर? कोणीही अशा व्यक्तीला वेड्यात काढल्याशिवाय राहणार नाही. पण, या तरुणाने आपला निर्णय खरा ठरवत सर्वांना अचंबित केलंय. या व्यक्तीला आता 'हेलिकॉप्टरवाला शेतकरी' म्हणून ओळखले जाते. ते ७ कोटी रुपयांच्या हेलिकॉप्टरचे मालक आहेत. विशेष म्हणजे, जेव्हा त्यांनी शेती करायला सुरुवात केली, तेव्हा त्यांच्याकडे फक्त ५ एकर शेती होती. आज ते १००० एकर शेतीचे मालक आहेत.
बँकेच्या केबिनमधून १००० एकरच्या साम्राज्यापर्यंत
राजाराम त्रिपाठी यांचा प्रवास एखाद्या चित्रपटकथेपेक्षा कमी नाही. एसबीआयची नोकरी सोडली तेव्हा त्यांच्याकडे वारसाहक्काने आलेली फक्त ५ एकर जमीन होती. त्यांनी टोमॅटोच्या शेतीने सुरुवात केली, पण लवकरच त्यांच्या लक्षात आले की, पारंपरिक पिकांच्या शेतीतून मोठा नफा आणि मोठे साम्राज्य उभे करणे शक्य नाही. याच वेळी त्यांच्यातील व्यवस्थापकाने आणि इनोव्हेटरने डोके लढवले. त्यांनी बाजाराचा अभ्यास करून आपला मोर्चा औषधी शेतीकडे वळवला. त्यांनी ज्या पिकाला बाजारात 'सफेद सोना' म्हटले जाते—त्या सफेद मुसळीची निवड केली.
सफेद मुसळीसोबतच त्यांनी अश्वगंधा, काळी मिरी आणि इतर अनेक हर्बल वनस्पतींची वैज्ञानिक पद्धतीने शेती सुरू केली. आज त्यांची 'मां दंतेश्वरी हर्बल ग्रुप' ही कंपनी २५ कोटी रुपयांचा वार्षिक टर्नओव्हर असलेले एक विशाल कृषी साम्राज्य बनले आहे. त्यांचे उत्पादन आता अमेरिका, जर्मनी, इंग्लंड आणि फ्रान्ससह १० हून अधिक पाश्चात्त्य देशांमध्ये निर्यात होते.
७ कोटींच्या 'हेलिकॉप्टर'ची नेमकी गरज का पडली?
जेव्हा राजाराम यांचा व्यवसाय १००० एकरांपर्यंत पसरला, तेव्हा त्यांच्यासमोर एक मोठे आव्हान उभे राहिले. इतक्या मोठ्या क्षेत्रावर पिकाची देखरेख करणे, कीड लागलेला भाग शोधणे आणि योग्य वेळी औषध फवारणी करणे पारंपरिक पद्धतीने जवळजवळ अशक्य झाले होते. राजाराम यांनी परदेशात शेतकऱ्यांकडून हेलिकॉप्टरने हे काम होताना पाहिले होते. त्यांनी ठरवले, की जर परदेशी शेतकरी हे करू शकतात, तर भारतीय शेतकऱ्यांनी का मागे राहायचे? याच विचारातून त्यांनी सुमारे ७ कोटी रुपये खर्च करून 'रॉबिन्सन R-44, ४-सीटर हेलिकॉप्टर' खरेदी केले.
ही खरेदी कोणताही छंद नसून, शेतीला आधुनिक बनवण्याची एक सोयीस्कर रणनीती होती. या हेलिकॉप्टरला व्यावसायिकपणे उडवण्यासाठी राजाराम, त्यांचे पुत्र आणि भाऊ, हे तिघेही उज्जैन येथील एका एव्हिएशन अकादमीतून पायलटची ट्रेनिंग घेत आहेत. हे हेलिकॉप्टर मिनिटांमध्ये अनेक एकर क्षेत्रावर औषध फवारणी करते, ज्यामुळे वेळ, श्रम आणि खर्चाची मोठी बचत होते.
विकास म्हणजे 'सगळ्यांची प्रगती'
राजाराम त्रिपाठी यांची यशोगाथा केवळ २५ कोटींच्या टर्नओव्हर किंवा ९ फार्महाऊसपर्यंत मर्यादित नाही. त्यांचे विचार फक्त नफा कमावण्यापलीकडे आहेत. त्यांनी आपल्या या प्रवासात ४०० हून अधिक आदिवासी कुटुंबांना केवळ रोजगार दिला नाही, तर त्यांना आधुनिक शेतीचे प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर बनवले. राजाराम म्हणतात, "खरा विकास तेव्हाच होतो, जेव्हा सगळ्यांचा फायदा होतो." ते आपले ७ कोटींचे हेलिकॉप्टर फक्त स्वतःच्या शेतांसाठी वापरत नाहीत, तर आसपासच्या शेतकऱ्यांच्या शेतीतही औषध फवारणीसाठी मदत करतात, जेणेकरून संपूर्ण कृषी समुदाय एकत्रितपणे पुढे जाऊ शकेल.
वाचा - ३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
शेतीतील या क्रांतीबद्दल राजाराम त्रिपाठी यांना तीन वेळा राष्ट्रीय स्तरावर 'बेस्ट फार्मर अवॉर्ड' देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
