Reliance FII Investment : दिग्गज उद्योजक मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील देशातील सर्वात मौल्यवान कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजमधील परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) गेल्या दोन वर्षांपासून सातत्यानं विक्री करत आहेत. यामुळे कंपनीतील त्यांचा हिस्सा दशकभराच्या नीचांकी पातळीवर पोहोचलाय. सप्टेंबर २०२२ पासून एफआयआय जवळपास प्रत्येक तिमाहीत रिलायन्सच्या शेअरमधील हिस्सा कमी करत आहेत. त्यांचा वाटा आर्थिक वर्ष २०२३ च्या दुसऱ्या तिमाहीतील २३.६ टक्क्यांवरून २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत १९.६ टक्क्यांवर आलाय. दरम्यान, रिलायन्समधील देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांचा हिस्सा गेल्या दोन वर्षांत १५ टक्क्यांवरून १९.१ टक्क्यांवर गेला आहे. सोमवारी बीएसईवर कंपनीचा शेअर १.९६ टक्क्यांनी घसरून १२२१.५० रुपयांवर व्यवहार करत होता.
एफआयआयच्या बाहेर पडण्यामुळे रिलायन्सनं गेल्या दोन वर्षांत १२ टक्के कमकुवत परतावा दिला आहे. जेफरीजच्या म्हणण्यानुसार कंपनीचा शेअर आता कोरोनानंतरच्या सर्वात खालच्या पातळीवर आहे, तर मॉर्गन स्टॅनलीच्या म्हणण्यानुसार आरआयएलचा पीई आता त्याच्या पाच वर्षांच्या सरासरीच्या जवळ आहे. कंपनीच्या तिसऱ्या तिमाहीच्या निकालात सुधारणा होण्याची चिन्हं दिसत आहेत. किरकोळ व्यवसायातील तेजीसह एबिटडामध्ये सुधारणा होण्याच्या अपेक्षेने ब्रोकरेजनं शेअरचं रेटिंग अपग्रेड केलंयआणि टार्गेट प्राईज वाढवली आहे. मॅक्रो आणि मायक्रो सेट-अप्स २०२६ मध्ये चांगला परतावा दर्शवत असल्याचं विश्लेषकांचं म्हणणं आहे.
काय म्हणाले एक्सपर्ट?
ब्रोकरेज फर्म एचएसबीसीनं गेल्या ४ वर्षांपासून आरआयएलला होल्ड रेटिंग दिलं होतं, परंतु आता ते आपला विचार बदलत आहेत. एचएसबीसीच्या म्हणण्यानुसार रिटेलमधील परिवर्तन, नवीन एनर्जी व्यवसायांची सुरुवात आणि डिजिटल व्यवसायातील तेजी चांगलं काम करू शकते, असा आमचा विश्वास आहे. ओ २ सी मध्ये घट झाली आहे आणि आणखी घट होण्यास वाव नाही. आरआयएलच्या भांडवली खर्चाची तीव्रता कमी होईल आणि फ्री कॅश फ्लो वाढेल अशी ब्रोकरेजची अपेक्षा आहे.
कुठपर्यंत जाणार किंमत?
गेल्या सहा महिन्यांत आरआयएलच्या खराब कामगिरीचं एक कारण म्हणजे किरकोळ क्षेत्रातील कमकुवत गती असल्याचं बोफा विश्लेषकांचं म्हणणं आहे. पण त्यात आणखी गती येण्याची शक्यता आहे. बोफाने रिलायन्ससाठी १,७२३ रुपयांचं टार्गेट प्राइस ठेवलंय. मॉर्गन स्टॅनलीनं रिलायन्सवर २,०२१ रुपयांचं टार्गेट प्राइस ठेवलंय. रिफायनिंग मार्जिन जास्त राहिल्यास, ई-कॉमर्स आणि ग्रीन एनर्जी बिझनेसमध्ये लक्षणीय प्रगती झाली आणि टेलिकॉम बिझनेसमध्ये एआरपीयू ग्रोथ झाली तर शेअर या पातळीपर्यंत जाऊ शकतो.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तीक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)