Crude Oil War : जागतिक तेल बाजारपेठेत सध्या एक नवीन आणि अत्यंत तीव्र 'किंमत युद्ध' सुरू झाले आहे. रशिया आणि इराण या दोन मोठ्या तेल उत्पादक देशांनी आपला साठा खपवण्यासाठी चीनच्या बाजारपेठेत सवलतींचा पाऊस पाडला आहे. भारताने रशियन तेलाच्या खरेदीत ४० टक्क्यांची कपात केल्याने रशियाने आता आपला मोर्चा पूर्णपणे चीनकडे वळवला असून, तिथे इराणसोबत त्यांची थेट स्पर्धा लागली आहे.
सवलतींची स्पर्धा: रशिया की इराण?
ब्लूमबर्गच्या ताज्या अहवालानुसार, निर्बंधांचा सामना करणारे हे दोन्ही देश जास्तीत जास्त तेल विकण्यासाठी किमती कमी करत आहेत. रशिया आता ब्रेंट क्रूडच्या तुलनेत प्रति बॅरल १२ डॉलर सवलत देत आहे, जी गेल्या महिन्यात १० डॉलर होती. इराणनेही आपली सवलत ११ डॉलर पर्यंत वाढवली आहे, जी डिसेंबरमध्ये ८-९ डॉलरच्या दरम्यान होती. या स्पर्धेमुळे दोन्ही देशांच्या महसुलावर प्रचंड दबाव येत आहे, मात्र तरीही आपला हिस्सा टिकवून ठेवण्यासाठी ही धडपड सुरू आहे.
समुद्रात कच्च्या तेलाचे महाकाय टँकर्स
स्थिती इतकी बिकट झाली आहे की, आशियाई समुद्री मार्गांवर कच्चे तेल भरलेले टँकर्स खरेदीदारांच्या प्रतीक्षेत उभे आहेत. इराणचा सुमारे ४ कोटी ८० लाख बॅरल तेलाचा साठा सध्या समुद्रात जहाजांवर पडून आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला हा आकडा ३ कोटी ३० लाख बॅरल होता. रशियाचेही सुमारे ९५ लाख बॅरल तेल आशियाई समुद्रात 'फ्लोटिंग स्टोरेज' म्हणून उभे आहे. सिंगापूरची खाडी आणि पिवळा समुद्र आता जणू तरंगते साठवणूक केंद्र बनले आहेत.
चीनच्या रिफायनरीज फुल्ल; रशियन तेलाला पसंती
चीनमधील खाजगी रिफायनरीज, ज्यांना 'टीपॉट' म्हटले जाते, त्यांची प्रक्रिया करण्याची क्षमता आता संपत आली आहे. त्यामुळे नवीन माल उचलण्यास त्यांनी नकार दिला आहे. विशेष म्हणजे, चिनी खरेदीदार आता इराणपेक्षा रशियन तेलाला अधिक पसंती देत आहेत. युक्रेन युद्धातील संभाव्य युद्धविराम आणि रशियावरील भविष्यातील निर्बंध कमी होण्याची आशा यामुळे रशियन तेल तुलनेने 'सुरक्षित' मानले जात आहे. याउलट, इराणवर अमेरिकेचे कडक निर्बंध आहेत आणि लष्करी कारवाईची टांगती तलवार असल्याने तिथून तेल आयात करणे चिनी कंपन्यांना जोखमीचे वाटत आहे.
वाचा - बँक घोटाळा भोवला! अनिल अंबानींचे मुंबईतील निवासस्थान जप्त; अलिशान घराची किंमत वाचून अवाक व्हाल
भारताचा 'यू-टर्न' ठरला कळीचा मुद्दा
जानेवारीपासून भारताने रशियाकडून घेणाऱ्या तेलात दिवसाला सुमारे ६ लाख बॅरलची कपात केली आहे. भारताने खरेदी थांबवल्याने रशियाचे हे कार्गो आता चीनकडे वळवण्यात आले आहेत. यामुळे इराणच्या पारंपरिक बाजारपेठेत रशियाने अतिक्रमण केले असून, यातूनच या प्राईस वॉरचा जन्म झाला आहे.
