Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > पाच वर्षांत पोलिसांची ६३ हजार पदे भरणार

पाच वर्षांत पोलिसांची ६३ हजार पदे भरणार

आर. आर. पाटील : तुरचीत उपनिरीक्षकांचा दीक्षांत सोहळा

By admin | Updated: July 12, 2014 22:06 IST2014-07-12T22:06:29+5:302014-07-12T22:06:29+5:30

आर. आर. पाटील : तुरचीत उपनिरीक्षकांचा दीक्षांत सोहळा

In five years, the police will fill 63,000 posts | पाच वर्षांत पोलिसांची ६३ हजार पदे भरणार

पाच वर्षांत पोलिसांची ६३ हजार पदे भरणार

. आर. पाटील : तुरचीत उपनिरीक्षकांचा दीक्षांत सोहळा
तासगाव (जि़ सांगली) : महाराष्ट्राला कधी नक्षलवाद्यांशी सामना करावा लागतो, तर कधी आतंकवादाला तोंड द्यावे लागते. वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण, लोकसंख्या या पार्श्वभूमीवर मोठी पोलीस भरती महाराष्ट्र पोलीस दलात करण्यात आली आहे. तरीही पोलिसांची संख्या कमी पडत आहे. त्यामुळेच या वर्षासह पुढील पाच वर्षांत ६३ हजार पोलिसांची अतिरिक्त भरती केली जाणार आहे. त्या प्रमाणात अधिकार्‍यांचीही संख्या वाढवली जाणार आहे, अशी माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शनिवारी दिली.
तुरची (ता. तासगाव) येथे महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या १०९ क्रमांकाच्या तुकडीतील २२५ पोलीस उपनिरीक्षकांच्या दीक्षांत संचलन सोहळ्यात ते बोलत होते. अकादमीचे संचालक नवल बजाज यावेळी उपस्थित होते.
गृहमंत्री पाटील म्हणाले की, एका बाजूला पोलिसांची संख्या वाढवत असताना गुणात्मक दर्जा वाढवण्यासाठी सेवांतर्गत प्रशिक्षणावर भर दिला जाणार आहे. सायबर क्राईम, आर्थिक गुन्हेगारी, बदलणारे कायदे लक्षात घेऊन यापुढच्या काळात पोलीस दलाला अधिक सक्षम बनवणे गरजेचे आहे. यापुढे परिपूर्ण प्रशिक्षण देण्यासाठी अकादमी प्रयत्नशील राहणार आहे. जनतेच्या अपेक्षा पूर्ण होतानाच कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांना जरब बसेल. चांगले वागणार्‍यांना आपला आधार वाटला पाहिजे, अशी अपेक्षा यावेळी प्रशिक्षण घेऊन बाहेर पडणार्‍या उपनिरीक्षकांकडून त्यांनी व्यक्त केली.
यावेळी नवल बजाज यांनीही मार्गदर्शन केले़ विविध स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळविलेल्या उपनिरीक्षकांचा यावेळी गृहमंत्री पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
चौकट
गृहमंत्र्यांचा विनम्र दावा
राज्याच्या पोलीस दलात एवढ्या मोठ्या प्रमाणावर भरती करत असताना कोठेही भ्रष्टाचार, वशिलेबाजीला थारा देण्यात आला नसल्याचा आमचा विनम्र दावा आहे. सर्वांत जास्त महिला पोलीस असणारे महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य आहे. महिलांना भरतीत ३० टक्के संधी दिली जाते, असे गृहमंत्री पाटील यांनी सांगितले.

...मन खिन्न होते!
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक जेव्हा भेटायला येतात व कितीजणांना लाच घेताना रंगेहात पकडले, हे सांगतात, तेव्हा त्यांचे अभिनंदन करताना दुसरीकडे मन खिन्न होते. रंगेहात पकडलेले पोलीस कर्मचारी-अधिकारी व त्यांच्या कुटुंबियांचे पुढे काय, हा प्रश्न सुन्न करून सोडणारा आहे. पोलिसी सेवा ही देशभक्ती, देशसेवा आहे. जनतेला लुटण्याचे हे साधन नाही, असेही गृहमंत्री पाटील यांनी सांगितले.

Web Title: In five years, the police will fill 63,000 posts