Investment Tips : अलीकडच्या काळात सोशल मीडियाच्या प्रभावामुळे जीवनशैलीत मोठा बदल पाहायला मिळत आहे. सध्या असण्यापेक्षा दिसण्याला जास्त महत्त्व दिलं जात आहे. परिणामी अनेकांना लाखो रुपये कमावूनही पैशाची चणचण भासत आहे. त्यामुळे पर्सनल लोन घेण्याचं प्रमाणही प्रचंड वाढत आहे. उत्पन्न वाढलं म्हणजे आपण आयुष्यात सेट झालो अशी तरुणांमध्ये धारणा तयार होत आहे. पण, हा कसा ट्रॅप आहे, यावर एएमएफआय रजिस्टर्ड एमएफडी असणारे भूपेंद्र पोपटानी यांनी प्रकाश टाकला आहे.
भूपेंद्र पोपटानी यांनी 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात त्यांनी एका क्लायंटचा अनुभव सांगितला आहे. हा अनुभव आज लाखो उच्च पगारदार तरुणांच्या जीवनाशी मिळताजुळता आहे.
'दिखावा' करण्याच्या नादात गुंतवणूक शून्य
भूपेंद्र पोपटानी यांनी पोस्टमध्ये लिहिले की, "मी एका ३० वर्षीय क्लायंटला भेटलो, जो दरमहा १ लाख ७० हजार रुपये कमावतो. नुकतेच त्याचे लग्न झाले आहे, चांगली नोकरी आहे आणि लोक त्याला 'परफेक्ट लाइफ' जगतो, असे म्हणतील. त्याच्याकडे नवी कार आहे, लेटेस्ट आयफोन आहे आणि घरही सुंदर सजवले आहे. पण जेव्हा मी त्याच्या पैशांबद्दल चर्चा केली, तेव्हा वास्तव समोर आले."
त्याच्या पगारापैकी सुमारे ९०,००० रुपये दरमहा कार, मोबाइल आणि नवीन घरगुती वस्तूंच्या ईएमआयमध्ये जातात. वरचे ३०,००० रुपये वीकेंड ट्रिप्स, बाहेर डिनर करणे आणि महागड्या वस्तू खरेदी करणे अशा लाईफस्टाईलवर खर्च होतात. यात बचत किंवा गुंतवणुकीचा कोणताही मागमूस नाही.
नोकरी गमावल्यास काय? मोठी चिंता
जेव्हा भुपेंद्र यांनी बचतीबद्दल विचारले, तेव्हा त्या क्लायंटने हसून उत्तर दिले: "आता तर आयुष्य एन्जॉय करू द्या. इतकी मेहनत करून इथपर्यंत पोहोचलो आहे. घर खरेदी करून सेटल झालो की बचत सुरू करेन." यावर पोपटानी यांनी त्याला थेट प्रश्न विचारला: "उद्या जर नोकरी गेली तर काय होईल? पाश्चात्य देशांसारखी इथे सरकार मदत करेल का? जसे की बेरोजगारी भत्ता, मोफत आरोग्य सेवा किंवा होम लोनमध्ये सूट?" क्लायंट शांत झाला, कारण दोघांनाही माहीत होते की याचे उत्तर 'नाही' आहे. भारतात तुमच्या मदतीला कोण येणार नाही.
Yesterday, I met a 30-year-old client earning ₹1.7 lakh a month. Recently married, good job, and living what most people would call a perfect life, a new car, the latest iPhone, and a beautifully furnished apartment.
But when we started talking about his finances, the reality…— Bhupendra Poptani (@Compoundingfund) October 30, 2025
खरी श्रीमंती 'नियंत्रण' आहे, जास्त उत्पन्न नाही
पोपटानी यांच्या मते, आजकाल लोक श्रीमंत दिसण्यासाठी ईएमआयवर कार घेतात, महागडी गॅजेट्स खरेदी करतात आणि सोशल मीडियासाठी फॅन्सी डिनरवर पैसे उडवतात. पण, एक नोकरी गमावणे किंवा अचानक आलेली वैद्यकीय आणीबाणी हे सर्वकाही उलथून टाकू शकते.
वाचा - सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
पोपटानी यांनी क्लायंटला समजावले की, "खरी श्रीमंती जास्त उत्पन्न नाही, तर तुमच्या निवडीवर, वेळेवर आणि मानसिक शांतीवर असलेले नियंत्रण आहे." 
इमर्जन्सी फंड तयार करणे, एसआयपी सुरू करणे आणि आपल्या कमाईपेक्षा थोडा कमी खर्च करणे हा त्याग नसून, भविष्याची एक उत्तम तयारी आहे. लोकांना आपला विकास साजरा करायला हवा, पण दिखावा थांबवायला हवा. जी गोष्ट गरजेची नाही, त्यावर नियंत्रण ठेवून संपत्ती निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करा, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
