AI Cyber Fraud : देशभरात नवरात्र उत्सव सुरू असून लवकरच दसरा आणि दिवाळी देखील तोंडावर आले आहेत. सणासुदीच्या काळात ऑनलाइन शॉपिंग आणि व्यवहारांमध्ये वाढ होते. तुम्हीही ऑनलाईन व्यवहार करत असाल तर तुम्हाला ही सावध करणारी बातमी आहे. कारण, सायबर गुन्हेगार आता फसवणुकीसाठी थेट आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करत आहे. अनेकदा आपण सोशल मीडियावर आपली खासजी माहिती, फोटो किंव्हा ट्रेंड फोलो करत असतो. याच माहितीचा वापर आता आपल्याच विरोधात केला जात आहे. एका अहवालानुसार, सणांच्या काळात सायबर फसवणुकीचे प्रमाण ४०% पर्यंत वाढते, ज्यात १५% फसवणूक व्यक्तीच्या सवयी आणि भावनांवर आधारित असते.
उदाहरणार्थ: तुम्ही हॉस्टेलमध्ये आहात, मित्र घरी गेला आहे. अचानक त्याचा व्हॉट्सॲप मेसेज येतो की, आईसाठी मिक्सर ग्राइंडर घ्यायचे आहे, दुकानदाराला ५,००० रुपये यूपीआय करायचे आहेत पण त्याचे पेमेंट अडकले आहे. तुम्ही लगेच पैसे पाठवता, कारण मित्राने तुम्हाला आधीच मिक्सर ग्राइंडरबद्दल सांगितले होते. नंतर फोन केल्यावर कळते की, तुमची फसवणूक झाली आहे!
एआयमुळे फसवणूक अधिक खरी वाटू लागली
सायबर सुरक्षा तज्ञ स्नेहा कटकर सांगतात की, जनरेटिव्ह एआयच्या मदतीने ठग असे मेसेज तयार करतात, जे अगदी खरे आणि विश्वासार्ह वाटतात. ते तुमच्या आवडीनिवडी, तुमच्या गरजा यांची माहिती गोळा करतात आणि त्याच माहितीचा वापर करून तुम्हाला टार्गेट करतात.
सेलिब्रेटींच्या नावाचा वापर: मैकेफी (McAfee) या सायबर सुरक्षा फर्मच्या अहवालानुसार, एआय वापरून आता सेलिब्रिटींच्या नावाने बनावट जाहिराती आणि ऑफर्स सोशल मीडियावर व्हायरल केल्या जातात.
ई-ग्रीटिंग कार्ड्सचा धोका: सणासुदीत ई-ग्रीटिंग कार्ड्सची देवाणघेवाण वाढते. अनेकदा या कार्ड्समध्ये व्हायरस असतात. डाउनलोड करताच तुमचा व्हॉट्सॲप हॅक होऊ शकतो आणि तुमच्या मित्रांना तुमच्याच नावाने पैशांची मागणी करणारे मेसेज पाठवले जातात.
ठग अत्यंत विचारपूर्वक विशिष्ट देश आणि वेळ निवडतात. फसवणुकीसाठी भारत नेहमीच टॉप ५ देशांमध्ये असतो. एकदा फसवणूक झाली की, पैसे परत मिळवणे जवळजवळ अशक्य होते.
सायबर फसवणुकीपासून कसे वाचाल?
सायबर गुन्हेगार आता केवळ रँडम मेसेज पाठवत नाहीत, तर तुमच्या नातेवाईक, मित्र किंवा सहकाऱ्यांसारखे बनून मेसेज करतात. अनेकदा ते एआय वापरून त्यांची आवाज किंवा फोटोही कॉपी करतात. अशा परिस्थितीत, समोरची व्यक्ती खरी आहे की नाही हे ओळखणे कठीण होते. तरीही काही स्मार्ट युक्त्या वापरून तुम्ही स्वतःचे संरक्षण करू शकता.
वाचा - दिवाळीला बायकोला द्या स्कूटर गिफ्ट! ८०,००० रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये मिळतायेत बेस्ट पर्याय
- पडताळणीसाठी फोन करा: जर कोणी व्हॉट्सॲप किंवा मेसेजद्वारे पैसे मागितले, तर लगेच त्यांना कॉल करा, व्हिडिओ कॉल हा सर्वात चांगला मार्ग आहे. फ्रॉड करणारे सहसा व्हिडिओ कॉल टाळतात.
- सिक्रेट कोड : मित्र आणि कुटुंबासोबत आधीच एक 'सिक्रेट कोड' सेट करा. जसे - 'आपली शेवटची ट्रिप कुठे झाली होती?' योग्य उत्तर न मिळाल्यास सावध व्हा.
- मेसेजच्या भाषेकडे लक्ष द्या: फसवणूक करणारे सहसा घाईघाईने किंवा असामान्य भाषेत लिहितात, जसे की "लवकर पैसे पाठवा", "UPI काम करत नाहीये". खरा व्यक्ती सहसा शांतपणे संवाद साधतो.
- दुहेरी खात्री करा: जर मोठी रक्कम असेल, तर दुसऱ्या एखाद्या विश्वासार्ह व्यक्तीकडून खात्री करून घ्या की, समोरच्याला खरोखरच पैशांची गरज आहे की नाही.
- सोशल मीडिया प्रोफाइल तपासा: अनेकदा ठग बनावट प्रोफाइल बनवतात. त्यांचे प्रोफाइल फोटो, जुन्या पोस्ट्स, कॉमन फ्रेंड्स तपासा. काही संशयास्पद वाटल्यास लगेच सावध व्हा.
- घाईघाईने व्यवहार करू नका: फसवणूक करणारे नेहमी लवकर व्यवहार करण्यासाठी दबाव टाकतात. पण तुम्ही संयम बाळगा, पडताळणी करा आणि मगच निर्णय घ्या.
- व्हॉईस क्लोनिंगपासून सावध रहा: आता एआय वापरून आवाजाची नक्कल केली जाऊ शकते. कॉलवर आवाजाबद्दल शंका आल्यास, कोणताही खासगी प्रश्न विचारा, ज्याचे उत्तर फक्त ती खरी व्यक्तीच देऊ शकेल.