Indian Railway Ticket Price Hike: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या भाड्याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे रेल्वेच्या उत्पन्नात मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे. नुकतेच रेल्वेनं नवीन भाडे रचना (New Fare Structure) लागू करण्याची घोषणा केली असून, ही नवीन रचना २६ डिसेंबर २०२५ पासून प्रभावी होणार आहे. या बदलाचा थेट परिणाम लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर होईल, तर कमी अंतराचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा देण्यात आला आहे. रेल्वेच्या मते, या निर्णयामुळे रेल्वेला सुमारे ६०० कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे.
प्रवाशांवर होणारा परिणाम आणि सवलत
नवीन नियमांनुसार, २१५ किलोमीटरपर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या भाड्यात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही, विशेषतः ऑर्डिनरी क्लासमध्ये प्रवास करणाऱ्यांना पूर्ण दिलासा देण्यात आला आहे. म्हणजेच दररोज प्रवास करणारे प्रवासी, विद्यार्थी आणि कमी अंतराचे प्रवासी यांच्यावर कोणताही आर्थिक बोजा पडणार नाही. मात्र, जर प्रवासाचे अंतर २१५ किलोमीटरपेक्षा जास्त असेल, तर भाड्यात थोडी वाढ झालेली पाहायला मिळेल.
रेल्वेची नवीन भाडे रचना
रेल्वेच्या नवीन भाडे रचनेनुसार, ऑर्डिनरी क्लासमध्ये २१५ किलोमीटरपेक्षा जास्त प्रवासासाठी प्रति किलोमीटर १ पैसा अतिरिक्त द्यावा लागेल. तसेच मेल/एक्सप्रेस ट्रेनच्या नॉन-एसी आणि एसी क्लासमध्ये प्रति किलोमीटर २ पैशांची वाढ करण्यात आली आहे. ही वाढ ऐकायला खूप कमी वाटत असली, तरी करोडो प्रवाशांची संख्या पाहता रेल्वेसाठी हे मोठ्या कमाईचं साधन ठरू शकतं. उदाहरणार्थ, जर एखादा प्रवासी मेल किंवा एक्सप्रेस ट्रेनने ५०० किलोमीटरचा नॉन-एसी प्रवास करत असेल, तर त्याला आधीच्या तुलनेत केवळ १० रुपये जास्त द्यावे लागतील. म्हणजेच प्रवाशांवर थेट मोठा बोजा टाकण्यात आलेला नाही, परंतु छोट्या बदलांमुळे रेल्वेला मोठा फायदा होणार आहे.
रेल्वे प्रशासनाची भूमिका
वाढता परिचालन खर्च, इंधन खर्च आणि देखभालीचा खर्च लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं. रेल्वे दीर्घकाळापासून प्रवासी भाड्यात मोठे बदल करण्याचे टाळत होती, परंतु आता मर्यादित आणि संतुलित वाढीद्वारे महसूल वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे रेल्वेला आपल्या सेवा सुधारण्यासाठी, ट्रॅक अपग्रेड करण्यासाठी, सुरक्षा आणि प्रवासी सुविधांवर अधिक खर्च करण्यास मदत होईल.
