Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > निर्यात वाढली, व्यापारी तूट घटली

निर्यात वाढली, व्यापारी तूट घटली

भारताच्या निर्यातीने मे महिन्यात सहा महिन्यांचा उच्चांक गाठत १२.४ टक्के वाढ नोंदविली आहे

By admin | Updated: June 12, 2014 00:15 IST2014-06-12T00:15:47+5:302014-06-12T00:15:47+5:30

भारताच्या निर्यातीने मे महिन्यात सहा महिन्यांचा उच्चांक गाठत १२.४ टक्के वाढ नोंदविली आहे

Exports increased, trade deficit decreased | निर्यात वाढली, व्यापारी तूट घटली

निर्यात वाढली, व्यापारी तूट घटली

नवी दिल्ली : भारताच्या निर्यातीने मे महिन्यात सहा महिन्यांचा उच्चांक गाठत १२.४ टक्के वाढ नोंदविली आहे. गेल्या सात महिन्यांत प्रथमच निर्यातीने दुहेरी आकडा गाठला असून, व्यापारी तुटीतही कपात झाली असून आयात -निर्यातीतील दरी कमी झाली आहे. व्यापारी तूट ११.२३ अब्ज डॉलर आहे.
वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्यात निर्यातीत १२.४ टक्के म्हणजेच २८ अब्ज डॉलर इतकी वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ नोंदण्यात आली आहे. या काळात आयात ११.४ टक्क्याने कमी झाली असून ती ३९.२३ अब्ज डॉलर झालेली आहे.
या दोन्ही बाबींच्या परिणामी व्यापारी तूट कमी झाली असून, गतवर्षीच्या १९.३७ अब्ज डॉलरच्या तुलनेत सध्याची तूट ११.२३ अब्ज डॉलरपर्यंत घसरली आहे. वाणिज्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार २०१३ साली व्यापारी तूट वाढण्यास कारणीभूत ठरलेली सोन्याची आयात किंवा कॅड ७२ टक्क्याने घसरली असून, ती २.१९ अब्ज डॉलर आहे. व्यापारी तुटीत असा फरक पडल्यामुळे सोन्याच्या आयातीवरील निर्बंध कमी करावेत, असे वाणिज्य मंत्रालयाने अर्थमंत्रालयाला कळविले आहे.
निर्यातीतून मिळालेला नफा व आयातीचा होणारा खर्च यातील फरक म्हणजे व्यापारी तूट असते. इंजिनिअरिंग, पेट्रोलियम पदार्थ व तयार कपडे या क्षेत्रातील निर्यातीमुळे मे महिन्यात निर्यातीतून २८ अब्ज डॉलर इतके उत्पन्न मिळाले. मे २०१३ मध्ये ते २४.९ अब्ज डॉलर इतके होते. आयातीत ११.४ टक्के घट झाली आहे; पण तरीही आयात ३९.२३ अब्ज डॉलर इतकी आहे.
असे असले तरीही हे नक्कीच स्वागतार्ह संकेत असल्याचे वाणिज्य मंत्री राजीव खेर यांनी म्हटले आहे. गेल्या सहा महिन्यांत प्रथमच निर्यातीने दुहेरी आकडा गाठला असून, निर्यातवाढीचा प्रवाह असाच राहिल्यास निर्यात लवकरच आपल्या नैसर्गिक पातळीपर्यंत येईल असे खेर म्हणाले. रुपयाचे मूल्य वाढत असले तरीही निर्यात वाढण्याचे ते एकमेव कारण नाही. सध्या भारतात सकारात्मक भावना आहे. पुढच्या महिन्यातही निर्यातीचे आकडे वाढीचेच राहतील असा माझा अंदाज आहे, तसे झाल्यास जागतिक मागणीत वाढ झाली आहे, असे मी नक्की म्हणेन, असे खेर यांनी सांगितले. ते पत्रकारांशी बोलत होते. २०१४-१५ सालासाठी निर्यातीचे लक्ष्य काय असे विचारले असता, दररोज १ अब्ज डॉलरची निर्यात व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असे त्यांनी सांगितले.
एप्रिल व मे महिन्यात यावर्षी निर्यात ८.८७ टक्के वाढली असून, या काळातील निर्यात ५३.६३ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे. या कालावधीत आयात १३.१६ टक्के घटली आहे. त्याचे मूल्य ७४.९५ अब्ज डॉलर आहे. त्यामुळे व्यापारी तूट २१.३ अब्ज डॉलरपर्यंत खाली आली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Exports increased, trade deficit decreased