Eternal Share: मंगळवारी झालेल्या कामकाजादरम्यान इटरनल लिमिटेडचे (Zomato) शेअर्स १५% पर्यंत वाढले आणि ३११.६० रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचले. यामुळे सीईओ आणि संस्थापक दीपिंदर गोयल यांच्या संपत्तीत दोन मिनिटांत १००० कोटी रुपयांपेक्षा अधिक वाढ झाली. जून तिमाहीच्या अखेरीस, गोयल यांचा इटरनलमध्ये ३.८३ टक्के हिस्सा होता. सोमवारी त्यांच्या इटरनलमधील हिस्स्याचं अंदाजे मूल्य १०,०२४ कोटी रुपयांवरून १,००१ कोटी रुपयांनी वाढून ११,०२५ कोटी रुपयांवर पोहोचलं. पहिल्या तिमाहीत अचानक झालेल्या वाढीनंतर मागील सत्रात इटरनल शेअर्समध्ये ५.६४ टक्क्यांनी वाढ झाली. म्हणजेच, अवघ्या दोन दिवसांत अब्जाधीश दीपिंदर गोयल यांच्या एकूण संपत्तीत जवळपास २००० कोटी रुपयांची वाढ झालीये.
₹१५ वरुन ₹४५५ वर ट्रेड करतोय 'हा' शेअर; जोरदार तेजी, आता मोठा Whiskey ब्रँड खरेदी करण्याची तयारी
जून तिमाहीचे निकाल
हॉटेल्समधून ऑनलाइन फूड ऑर्डरिंग आणि जलद डिलिव्हरी सेवा देणाऱ्या इटरनलनं गेल्या सोमवारी जून तिमाहीचे निकाल जाहीर केले. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा २५ कोटी रुपयांपर्यंत कमी झालाय. कंपनीच्या नफ्यात प्रामुख्यानं वाढत्या खर्चामुळे घट झालीये. ही कंपनी झोमॅटो आणि ब्लिंकिट ब्रँड चालवते. मागील आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या याच तिमाहीत इटरनलला २५३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार तिमाहीत, इटरनलचं ऑपरेटिंग उत्पन्न गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत ४,२०६ कोटी रुपयांवरून ७,१६७ कोटी रुपयांवर पोहोचलंय. कंपनीने ब्लिंकिट फूड्सच्या स्थापनेबद्दल शेअर बाजारालाही माहिती दिली.
ब्रोकरेजने काय म्हटलं?
जेएम फायनान्शियलनं म्हटल्यानुसार ब्लिंकिटच्या आघाडीवर पहिल्या तिमाहीत इटरनलनं पुन्हा एकदा सकारात्मकरित्या आश्चर्यचकित केलंय. "यावेळी आश्चर्याची बाब म्हणजे यावेळी रिपोर्ट आकड्यांपेक्षा अधिक मॅनेजमेंट कॉमेंट्रीवर होता. Q4FY25 च्या निकालांनंतर घेतलेल्या सावध भूमिकेपासून हे तिमाही निकाल पूर्णपणे वेगळे होते," असं ब्रोकरेजनं म्हटलंय.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)