खासगी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारीभविष्य निर्वाह निधी संघटनेने एक अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. एखाद्या कर्मचाऱ्याने नोकरी बदलताना मध्ये आलेले शनिवार, रविवार किंवा इतर सार्वजनिक सुट्ट्या आता 'सेवा खंड' मानल्या जाणार नाहीत. १७ डिसेंबर २०२५ रोजी जारी केलेल्या नवीन परिपत्रकानुसार, EDLI योजनेचे नियम अधिक सोपे आणि व्यावहारिक करण्यात आले आहेत.
यापूर्वी, जर एखाद्या कर्मचाऱ्याने शुक्रवारी जुनी नोकरी सोडली आणि सोमवारी नवीन कंपनीत रुजू झाला, तर मधले दोन दिवस (शनिवार-रविवार) सेवा खंड मानले जात असत. यामुळे, १२ महिने 'सतत सेवा' पूर्ण नसल्याचे कारण देऊन विम्याचे दावे नाकारले जायचे. आता EPFO ने स्पष्ट केले आहे की शनिवार, रविवार किंवा घोषित साप्ताहिक तसेच सरकारी सुट्ट्या 'ब्रेक' मानल्या जाणार नाहीत.
या नियमातून राष्ट्रीय सुट्ट्या, राजपत्रित सुट्ट्या आणि राज्यांच्या सुट्ट्यांनाही सवलत मिळणार आहे. दोन नोकऱ्यांमधील ६० दिवसांपर्यंतचा फरक आता 'सतत सेवा' म्हणून ग्राह्य धरला जाईल.
EDLI योजना काय आहे?
पीएफ खाते असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला EDLI योजनेअंतर्गत कोणत्याही प्रीमियमशिवाय ७ लाख रुपयांपर्यंतचे मोफत जीवन विमा कवच मिळते. जर कर्मचाऱ्याचा नोकरीत असताना दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबाला ही रक्कम दिली जाते.
कुटुंबांना मिळणार मोठा आधार
या स्पष्टीकरणामुळे अशा हजारो कुटुंबांना फायदा होईल ज्यांचे विम्याचे दावे केवळ तांत्रिक कारणांमुळे अडकले होते. आता जर शेवटच्या योगदानानंतर ६ महिन्यांच्या आत कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आणि त्याचे नाव कंपनीच्या रेकॉर्डवर असेल, तरीही त्याच्या वारसांना विमा लाभ मिळणे सुलभ होईल.
