लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशातील उद्योजकतेला चालना देणाऱ्या ‘स्टार्टअप इंडिया’ उपक्रमाने २०२५-२६ या आर्थिक वर्षात नवा उच्चांक गाठला आहे. या कालावधीत तब्बल ५५,२०० हून अधिक संस्थांना स्टार्टअप म्हणून मान्यता देण्यात आली असून, एका वर्षातील ही आतापर्यंतची सर्वाधिक नोंद आहे.
उद्योग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, १६ जानेवारी २०१६ रोजी सुरू झालेल्या या उपक्रमानंतर देशातील स्टार्टअपची संख्या ३१ मार्चपर्यंत २.२३ लाखांवर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, केवळ कागदावरच नव्हे, तर जमिनीवरही याचे मोठे सकारात्मक परिणाम दिसून येत असून, या उद्योगांनी आतापर्यंत २३.३६ लाखांहून अधिक प्रत्यक्ष रोजगार निर्माण केले आहेत. देशातील स्टार्टअप क्रांतीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. देशातील सर्वाधिक स्टार्टअप्स आणि सुमारे २५% युनिकॉर्न्स एकट्या महाराष्ट्रात आहेत.
कर्ज हमी मर्यादेत दुप्पट वाढ
- उद्योजकांना भांडवल सुलभ व्हावे, यासाठी सरकारने क्रेडिट गॅरंटी योजनेचा विस्तार केला आहे. यामध्ये प्रतिकर्जदार हमी कवच १० कोटी रुपयांवरून थेट २० कोटी रुपये करण्यात आले आहे.
- मार्च २०२६ अखेरपर्यंत १,२५० कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या ४१० कर्जांना सरकारने हमी दिली आहे. सीड फंड योजनेत २१९ इनक्यूबेटरची निवड करून ९४५ कोटींचा निधी वितरित करण्यात आला.
विविध क्षेत्रातील स्टार्ट्सअप
सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे भारतात नवउद्योजकतेचा वेग लक्षणीयरीत्या वाढत आहे. तंत्रज्ञान, सेवा, उत्पादन आणि ग्रामीण नवकल्पना अशा विविध क्षेत्रांतील स्टार्टअप्स पुढे येत आहेत. ते केवळ रोजगारनिर्मितीच नव्हे तर देशाच्या आर्थिक वृद्धीलाही नवी चालना देत आहेत.
केंद्र सरकारकडून मिळाले आर्थिक मदतीचे बळ
सरकारने ‘फंड ऑफ फंड्स फॉर स्टार्टअप्स’, सीड फंड स्कीम आणि क्रेडिट गॅरंटी स्कीम अशा योजनांमधून आर्थिक मदत केली. सरकारने १०,००० कोटी रुपयांच्या निधीसह ‘स्टार्टअप इंडिया फंड ऑफ फंड्स २.०’ची घोषणा केली असून, याद्वारे अधिक गुंतवणुकीची अपेक्षा आहे. फंड ऑफ फंड्सअंतर्गत २०२५-२६ अखेरपर्यंत १३५ पेक्षा अधिक पर्यायी गुंतवणूक निधींना ७,००० कोटी रुपयांहून अधिक निधी वितरित करण्यात आला. या निधीमार्फत पुढे १,४२० हून अधिक स्टार्टअपमध्ये २६,९०० कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक झाली.
का झाला वेगाने विस्तार?
- सरकारने नवकल्पनांना प्रोत्साहन दिले.
- अनुदान व वित्तपुरवठ्याची सुलभता.
- खासगी गुंतवणुकीत वाढ.
