एमक्योर कंपनीने वजन कमी करणारे प्रसिद्ध औषध भारतीय बाजारात आणण्यासाठी नोवो नॉर्डिस्क (Novo Nordisk) या बहुराष्ट्रीय कंपनीशी महत्वाचा करार केला आहे. नोवो नॉर्डिस्कच्या भारतीय शाखेने एमक्योरच्या सहकार्याने ‘पोविझ्ट्रा (Poviztra)’ हे औषध भारतात लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर एमक्योर कंपनीच्या शेअरची किंमत तब्बल ८ टक्क्यांची वधारली आहे.
हे औषध ‘वेगोवी (Wegovy)’ या त्यांच्या जागतिक स्तरावर प्रसिद्ध वजन कमी करणाऱ्या औषधाचाच दुसरा ब्रँड आहे. या भागीदारीचा उद्देश भारतातील लठ्ठपणावरील उपचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. या करारानुसार एमक्योरला या औषधाच्या वितरण आणि विपणनाचे विशेष अधिकार मिळाले आहेत.
अशा पद्धतीने पोहोचेल लोकांपर्यंत -
एमक्योर कंपनी या औषधाचे देशभरात वितरण आणि प्रचार करणार आहे. कंपनीचे विस्तृत नेटवर्क या औषधाला मोठ्या शहरांपासून ते अगदी ग्रामीण भागापर्तयंत पोहोचवील. जिथे नोवो नॉर्डिस्कला पोहोचण्यात मर्यादा येतात.
‘पोविझ्ट्रा’ आणि ‘वेगोवी’ या दोन्ही औषधांमध्ये सेमाग्लुटाइड हा सक्रिय घटक आहे. हे साप्ताहिक इंजेक्शन स्वरूपातील औषध असून शरीरातील भूक नियंत्रित ठेवून आणि कॅलरीचे प्रमाण कमी करून वजन घटविण्यास मदत करते. जागतिक संशोधनानुसार, या औषधाचा वापर करणाऱ्या प्रत्येक तीन व्यक्तींमधील एकाचे वजन २० टक्क्यांहून अधिक घटले आहे.
नोवो नॉर्डिस्कच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, ही भागीदारी भारतातील लठ्ठपणावरील उपचार अधिक प्रभावीपणे राबविण्याचा एक प्रयत्न आहे. तर, एमक्योरच्या प्रमुखांनी म्हटले की, भारतीय रुग्णांपर्यंत जगातील सर्वाधिक विश्वसनीय वजन कमी करणारे औषध पोहोचविण्यात आपल्याला अभिमान वाटतो.
या करार भारतातील वाढत्या लठ्ठपणावरील अथवा स्थूलत्वावरील उचारासंदर्भात महत्वाच मानला जात आहे. यामुळे औषध पुरवठा अधिक सुलभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या करारामुळे एमक्योरच्या शेअरमध्ये गेल्या सहा महिन्यांत तब्बल ४० टक्क्यांची वाढ झाली आहे.
(टीप - येथे केवळ कंपनीची आणि शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
