Elon Musk Company IPO: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क (Elon Musk) यांची आणखी एक कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्यासाठी सज्ज झाली आहे. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, मस्क यांच्या नेतृत्वाखालील स्पेस एक्सचा (SpaceX) आयपीओ (IPO) पुढील वर्षी म्हणजेच २०२६ मध्ये येऊ शकतो. कंपनी १ ट्रिलियन डॉलरच्या मूल्यांकनावर २५ बिलियन डॉलर उभारण्याचा प्रयत्न करेल.
रिपोर्टनुसार, स्पेस एक्सनं आयपीओसाठी बँकांशी चर्चा सुरू केली आहे. या प्रकरणाची माहिती असलेल्या व्यक्तीनुसार, हा आयपीओ २०२६ च्या जून किंवा जुलै मध्ये येऊ शकतो. परंतु, स्पेस एक्सकडून आयपीओबद्दल कोणतंही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेलं नाही. विशेष म्हणजे, २०२० मध्ये मस्क यांनी, स्पेस एक्सचा महसूल आणि वाढ यांचा अंदाज अचूकपणे लावता येईल, तेव्हा कंपनी लिस्ट केली जाईल, असं म्हटलं होतं.
१ ट्रिलियन डॉलर्स मूल्यांकनावर फक्त एकच आयपीओ
आजपर्यंत केवळ सऊदी अरामको (Saudi Aramco) ही एकमेव अशी कंपनी आहे, जिचा आयपीओ १ ट्रिलियन डॉलरच्या मूल्यांकनावर आला होता. या कंपनीनं २०१९ मध्ये बाजारात प्रवेश केला होता. तेव्हा कंपनीचे मार्केट कॅप १.७ ट्रिलियन डॉलर होतं.
मस्क इतका पैसा कशासाठी वापरणार?
मस्क यांच्या नेतृत्वाखालील स्पेस एक्स कंपनी आयपीओमधून जमा केलेला पैसा अंतराळ-आधारित डेटा सेंटर, चिप्स इत्यादींसाठी वापरेल. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, २०२५ मध्ये स्पेस एक्स १५ अब्ज डॉलरचा महसूल मिळवेल. पुढील वर्षी कंपनीचा महसूल २२ अब्ज डॉलर ते २४ अब्ज डॉलरच्या दरम्यान राहू शकतो. स्पेस एक्सच्या महसुलाचा मोठा हिस्सा स्टारलिंककडून येईल. मागील आठवड्यात बातमी आली होती की, कंपनी ८०० अब्ज डॉलरच्या मूल्यांकनावर शेअर्स विकणार आहे. परंतु मस्क यांनी शनिवारी या बातम्यांचं खंडन केलं होतं.
