Musk becomes world's first half-trillionaire: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणारे एलन मस्क संपत्तीतील वाढीमुळे नव्या उंचीवर पोहोचले आहे. मस्क यांनी नवा जागतिक विक्रम केला आहे, जो आतापर्यंत कुणालाच करता आलेला नाही. एलन मस्क हे जगातील पहिले हाफ ट्रिलियन संपत्ती असणारे व्यक्ती बनले आहेत. त्यांची नेटवर्थ ५०० बिलियन डॉलरच्या पुढे गेली आहे.
टेस्ला कंपनीसह इतर काही कंपन्यांचे एलन मस्क मालक आहे. त्यांची इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला आणि इतर कंपन्यांचे मूल्य वाढल्यामुळे त्यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे.
फोर्ब्स बिलिनिअर्सच्या रिपोर्टनुसार, एलन मस्क यांची संपत्ती बुधवारी दुपारी (अमेरिकन प्रमाणवेळेप्रमाणे) $500.1 बिलियन डॉलरवर पोहोचली. पण, नंतर ती $499 आणि नंतर $500 बिलियन डॉलरच्या दरम्यान राहिली.
एलन मस्क किती श्रीमंत आहेत, याचा अंदाज लावायचा झाला, तर मस्क यांच्याकडे इतकी संपत्ती आहे की, जगातील १५३ देशांचा जीडीपी $500 बिलियन डॉलरपेक्षा कमी आहे.
एलन मस्क कोठून पैसे कमावत आहेत?
उद्योगपती एलन मस्क यांनी एकाच वेळी अनेक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक केलेली आहे. बीबीसी वर्ल्डच्या रिपोर्टनुसार, टेस्ला कंपनीबरोबरच मस्क यांच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्टार्टअप xAI आणि रॉकेट कंपनी SpaceX सह इतरही काही कंपन्यांचे मूल्य गेल्या काही काळापासून वाढत आहेत.
एलन मस्क यांची आणखी जमेची बाजू म्हणजे सर्वात श्रीमंत असलेल्या हा व्यक्ती त्याच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात खूप पुढे आहे. दक्षिण आफ्रिकेत जन्म झालेल्या मस्क यांची सर्वाधिक कमाई टेस्ला कंपनीतून आहे.
१५ सप्टेंबर २०२५ पर्यंत त्यांची १२.४ टक्के पेक्षा जास्त भागीदारी कंपनीमध्ये होती. कंपनीचा शेअर या वर्षी १४ टक्क्यांनी वाढला आहे. बुधवारी कंपनीचा शेअर ४ टक्क्यांनी वाढला होता. त्यामुळे त्यांच्या संपत्तीत अंदाजे ९.३ बिलियन डॉलरची भर पडली.