Reliance Communications Ltd: अनिल अंबानी यांच्या कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन्सचे शेअर्स एका आठवड्यानंतर आज सोमवारी बाजारात ट्रेड करत होते. कंपनीच्या शेअर्सना आज ५% टक्क्यांचं लोअर सर्किट लागलं आणि शेअर्स १.३३ रुपयांवर आले. दिवाळखोरी प्रक्रियेतून जात असलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमागे ईडीची कारवाई आहे. सक्तवसूली संचालनालयाने (ईडी) २४ जुलै २०२५ रोजी नवी मुंबईतील रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या कार्यालयांवर शोध आणि जप्तीची कारवाई केली. कंपनीनं २५ जुलै रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजला (NSE) औपचारिकपणे कळवून या कारवाईची पुष्टी केली.
काय आहे प्रकरण?
रिलायन्स कम्युनिकेशन्सचे कॉर्पोरेट मुख्यालय असलेल्या धीरूभाई अंबानी नॉलेज सिटीच्या एच आणि बी ब्लॉकमध्ये हे छापे टाकण्यात आले. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा, २००२ च्या कलम १७(१) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. शोधमोहिमेदरम्यान, ईडीने मुख्य वित्तीय अधिकारी आणि कंपनी सचिव यांचे दोन लॅपटॉप आणि ईमेल रेकॉर्ड जप्त केले. कंपनीनं स्पष्ट केलंय की छाप्यापूर्वी ईडीने कोणताही अंतरिम किंवा अंतिम आदेश जारी केला नव्हता.
गुंतवणुकीसाठी बेस्ट आहे 'ही' सरकारी स्कीम; एकदा गुंतवणूक करा आणि दरवर्षी मिळवा २ लाखांचं फिक्स व्याज
रिलायन्स कम्युनिकेशन्सनं त्यांच्या निवेदनात ईडीच्या कारवाईचा त्यांच्या आर्थिक किंवा ऑपरेशनल कामकाजावर कोणताही परिणाम होणार नसल्याचं म्हटलं. कंपनी आधीच कॉर्पोरेट दिवाळखोरी निराकरण प्रक्रियेतून जात आहे. 'रिलायन्स पॉवर' आणि 'रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर' या समूहाच्या दोन कंपन्यांनी गेल्या गुरुवारी शेअर बाजाराला दिलेल्या स्वतंत्र माहितीत, ईडीच्या कारवाईचा त्यांच्या व्यवसायाच्या कामकाजावर, आर्थिक कामगिरीवर, शेअरहोल्डर्सवर, कर्मचाऱ्यांवर किंवा इतर कोणत्याही भागधारकांवर कोणताही परिणाम झालेला नसल्याचं म्हटलं.
स्टॉक ९९% ने घसरला
कंपनीचे शेअर्स एका महिन्यात १५% नं घसरले आहेत आणि या वर्षी आतापर्यंत ३२% नं घसरले आहेत. एका वर्षात त्यात २५% आणि पाच वर्षांत ६०% घट झाली आहे. त्याच वेळी, या स्टॉकमध्ये दीर्घकाळात ९९% पर्यंत घट झाली आहे. १० मार्च २००६ रोजी कंपनीचे शेअर्स ३०० रुपयांवर होते.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)