Reliance Power News : उद्योगपती अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स पॉवर कंपनीशी संबंधित ६८ कोटी रुपयांच्या बनावट बँक गॅरंटी प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने तिसरी अटक केली आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली असून, अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव अमर नाथ दत्ता आहे. दत्ता यांना गुरुवारी ताब्यात घेण्यात आले असून त्यांना चार दिवसांची रिमांड मिळाली आहे.
आतापर्यंत 'या' तिघांना अटक
या बनावट बँक गॅरंटी प्रकरणाच्या तपासाच्या अंतर्गत ईडीने आतापर्यंत तीन प्रमुख व्यक्तींना अटक केली आहे.
- अमर नाथ दत्ता: (गुरुवारी अटक)
- अशोक कुमार पाल: रिलायन्स पॉवरचे माजी मुख्य वित्तीय अधिकारी.
- पार्थ सारथी बिस्वाल: ओडिशास्थित बिस्वाल ट्रेडलिंक नावाच्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक.
तिघांनाही विशेष न्यायालयात हजर करण्यात आले, जिथून त्यांना पुढील तपासासाठी रिमांडवर पाठवण्यात आले आहे.
नेमके काय आहे हे ६८ कोटींचे प्रकरण?
हा संपूर्ण घोटाळा रिलायन्स पॉवरची उपकंपनी असलेल्या रिलायन्स एनयू बीईएसएस लिमिटेडशी संबंधित आहे. या कंपनीने सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडे ६८.२ कोटी रुपयांची बँक गॅरंटी जमा केली होती. ईडीच्या तपासणीत ही बँक गॅरंटी बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही कंपनी यापूर्वी महाराष्ट्र एनर्जी जनरेशन लिमिटेड या नावाने ओळखली जात होती.
ईडीचा बिस्वाल ट्रेडलिंकवर गंभीर आरोप
ईडीने आरोप केला आहे की, बिस्वाल ट्रेडलिंक बिझनेस ग्रुप हा ८% कमिशनवर 'बनावट' बँक गॅरंटी जारी करण्याचे रॅकेट चालवत होता. या प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोव्हेंबर २०२४ मध्ये मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल केला होता.
वाचा - २५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
यावर रिलायन्स ग्रुपने यापूर्वी स्पष्टीकरण दिले होते की, अनिल अंबानी हे साडेतीन वर्षांहून अधिक काळ 'बोर्ड ऑफ रिलायन्स पॉवर लिमिटेड'मध्ये नाहीत आणि या प्रकरणाशी त्यांचा कोणताही संबंध नाही. मात्र, माजी CFO ला अटक झाल्यामुळे कंपनी अडचणीत आली आहे.
