अहमदाबादमध्ये एका सामान्य दिसणाऱ्या रिफंडची रिक्वेस्ट एका महिलेसाठी वाईट स्वप्नासारखी ठरली. महिलेनं क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून फक्त २४ रुपयांची वांगी मागवली होती, परंतु चुकीचा प्रोडक्ट मिळाल्यावर जेव्हा तिनं रिफंड घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सायबर चोरट्यांनी तिच्या खात्यातून ८७,००० रुपये लंपास केले. यावरुन आजकाल फसवणूक करणारे किती सहजपणे लहान-लहान कारणं शोधून लोकांना जाळ्यात अडकवतात हे दिसून येतं. फक्त एक चुकीचा कॉल, एक चुकीची लिंक आणि काही मिनिटांत संपूर्ण बँक खातं रिकामं.
महिलेनं तीन दिवसांपूर्वी झेप्टो वरून भाज्या मागवल्या होत्या, पण आलेली वांगी आकारात खूप मोठी होती. तिनं डिलिव्हरी बॉयशी रिटर्नबद्दल संवाद साधल्यानंतर, त्यानं सांगितलं की तो रिफंड करू शकत नाही आणि त्यासाठी कस्टमर सपोर्टशी बोलावं लागेल. खरी गडबड इथूनच सुरू झाली, कारण डिलिव्हरी बॉयकडे कस्टमर केअरचा नंबर नव्हता.
आधार फोटोकॉपीवर बंदी... लवकरच येणार कडक नियम, नक्की काय आहे सरकारचा प्लॅन?
इंटरनेटवर नंबर शोधला आणि अडकली
महिलेनं ऑनलाईन कस्टमर सपोर्ट नंबर शोधला आणि याच दरम्यान तिला एक बनावट नंबर मिळाला. त्या तथाकथित एक्झिक्युटिव्हनं तिला कॉल करण्यास सांगितले आणि नंतर व्हॉट्सॲप कॉलवर बोलणं केलं. महिलेने त्याला संपूर्ण तपशील दिला आणि ठगाने रिफंडची प्रक्रिया झाली असल्याचं सांगितलं. यानंतर त्याने एक लिंक पाठवली, ज्यात रिफंडची स्थिती पाहण्याचा दावा करण्यात आला होता.
लिंकमध्ये बँक तपशील टाकताच पूर्ण खेळ झाला
जेव्हा महिलेने ती लिंक उघडली, तेव्हा तिथे बँक खात्याचा तपशील भरण्यास सांगितलं गेलं. तिनं आपली माहिती भरली आणि त्यानंतर यूपीआय पासवर्ड टाकून बॅलन्स चेक केला. रिफंडचे पैसे न दिसल्यानं तिनं पुन्हा कॉल केला. यावेळी तिला दुसऱ्या खात्याचा बॅलन्स चेक करण्यास सांगितलं गेलं. तिने चेक करताच, तिला ८७,००० रुपये गायब झाल्याचं लक्षात आलं.
पोलिसांत तक्रार, लोकांना सतर्क राहण्याची गरज
फसवणूक झाल्याचं कळताच महिलेनं त्वरित स्थानिक पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीनं प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ऑनलाईन रिफंड, बनावट कस्टमर केअर नंबर आणि व्हॉट्सॲप कॉलद्वारे होणारी फसवणूक आजकाल किती वेगानं वाढत आहे, हे या घटनेवरुन दिसून येतंय.
अधिकार्यांच्या मते, खऱ्या कंपन्या कधीही व्हॉट्सॲप कॉलवर बँक तपशील किंवा यूपीआय पासवर्ड मागत नाहीत. कस्टमर केअर नंबर नेहमी अधिकृत ॲप किंवा वेबसाइटवरूनच घेतला पाहिजे. कोणत्याही लिंकवर बँक तपशील टाकणं म्हणजे थेट सायबर जाळ्यात अडकण्यासारखे आहे.
